• शेतकऱ्यांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन

बेळगाव / प्रतिनिधी

बेळगावमधील खासगी ‘जय किसान भाजी मार्केट’चा परवाना रद्द करून तात्काळ बंद करण्यासाठी आज शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार निदर्शने केली. या वेळी जिल्हाधिकाऱ्यांच्या गाडीला शेतकऱ्यांनी घेराव घातला.

शेतकरी नेत्यांनी सांगितले की, न्यायालयाच्या आदेशानंतरही हे खासगी मार्केट सुरूच आहे. या प्रकरणी सरकार आणि प्रशासनाने त्वरित कारवाई करावी, अशी मागणी आंदोलकांनी केली. “जोपर्यंत हे मार्केट बंद होत नाही, तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही. आवश्यकता भासल्यास रस्ता रोको आंदोलनही छेडले जाईल,” असा इशारा त्यांनी दिला.

एका महिला आंदोलनकर्त्यांनी सांगितले, “या खासगी भाजी मार्केटवर न्यायालयाचा बंद करण्याचा आदेश आहे, तरीही त्याचे पालन होत नाही. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी याकडे लक्ष घालावे,” असे आवाहन त्यांनी केले.

जिल्हाधिकाऱ्यांची गाडी कार्यालयातून बाहेर पडताच शेतकऱ्यांनी गाडीला घेरले. जिल्हाधिकाऱ्यांनी तत्काळ गाडीतून उतरून शेतकऱ्यांशी संवाद साधला. त्यांनी सायंकाळी ५ वाजेपर्यंत योग्य कारवाईचे आश्वासन दिले. मात्र, शेतकऱ्यांनी तात्काळ वीजपुरवठा खंडित करण्याची मागणी केली.

या आंदोलनामुळे जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात तणावाचे वातावरण पसरले होते.