बेळगाव / प्रतिनिधी

केंद्र सरकारने अंमलात आणलेल्या नवीन श्रमशक्ती योजनेविरोधात सिटू संघटनेतर्फे आज बेळगावमध्ये जोरदार आंदोलन करण्यात आले. यावेळी योजनेशी संबंधित अंमलबजावणी दस्तऐवजांची प्रतीकात्मक जाळपोळ करून निषेध नोंदविण्यात आला.

आंदोलनकर्त्यांनी सरकारवर कामगारांचे हक्क कमी करण्याचा आरोप केला. ४४ विविध कामगार कायद्यांचे केवळ चार संहितांत रूपांतर करून कामगारांची सामूहिक शक्ती कमी करण्याचा प्रयत्न होत असल्याची टीका करण्यात आली.

१२ वर्षांखालील कामगारांना या कायद्यांचा लाभ न देणे ही मोठी अन्यायकारक गोष्ट असून, यामुळे बालकामगारांना संरक्षणच मिळणार नाही, असा सवाल सिटू नेते आयुब जैनेखान यांनी उपस्थित केला. याशिवाय, कामगारांना कायमस्वरूपी नोकरी न देता कंत्राटी पद्धतीत अडकवण्याचा सरकारचा डाव आहे, अशीही नाराजी व्यक्त करण्यात आली.

कामगारांच्या हक्कांकडे दुर्लक्ष करून जमीनदार व मोठ्या कॉर्पोरेट कंपन्यांच्या फायद्यासाठी हे कायदे आणले जात असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. आंदोलनात सिटू-समवेत विविध कामगार संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.