चिक्कोडी : चिक्कोडी-निपाणी राज्य महामार्गावरील चिंचणी टोलनाका परिसरात रविवारी झालेल्या भीषण अपघातात दुचाकीवरील दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला. ट्रकच्या मागील बाजूस दुचाकीची जोरदार धडक बसल्याने हा अपघात घडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

मृतांची ओळख चिक्कोडीतील ओतारी गल्ली परिसरातील सिद्धू कुरळे आणि स्वरूप माळवदे अशी झाली आहे. हे दोघेही आपले काम आटोपून दुचाकीवरून घरी परतत असताना चिंचणी टोलनाका परिसरात हा दुर्दैवी अपघात घडला.

प्राथमिक माहितीनुसार, चिक्कोडीकडे जाणाऱ्या ट्रकच्या मागील बाजूस त्यांच्या दुचाकीची जोरदार धडक बसली. धडकेची तीव्रता इतकी मोठी होती की दोघेही रस्त्यावर फेकले गेले. डोक्याला गंभीर दुखापत होऊन मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्याने दोघांचाही घटनास्थळीच मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी पुढील तपास सुरू असून, या दुर्दैवी घटनेमुळे चिक्कोडी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.