• संशयास्पद व्यक्तीच्या हालचालींमुळे गूढ वाढले
  • आगीचे कारण शोधण्यासाठी तीन पथकांकडून तपास
  • सीसीटीव्ही फुटेज, विद्युत यंत्रणा आणि प्रत्यक्षदर्शींच्या माहितीची छाननी

बेळगाव : चव्हाट गल्ली येथे झालेल्या भीषण आगीत सहा जणांचा होरपळून मृत्यू झाल्याच्या घटनेचा तपास पोलिसांनी अधिक व्यापक केला आहे. आगीचे नेमके कारण शोधण्यासाठी तीन स्वतंत्र पथके नियुक्त करण्यात आली असून, घटनास्थळावरील पुरावे, सीसीटीव्ही फुटेज आणि प्रत्यक्षदर्शींच्या माहितीसह विविध शक्यता तपासल्या जात आहेत.

घटनेच्या दिवशी परिसरात एका संशयास्पद व्यक्तीचा वावर सीसीटीव्हीमध्ये कैद झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे या व्यक्तीच्या हालचालींच्या दिशेनेही पोलिसांनी तपास सुरू केला आहे. सुरुवातीला विद्युत बिघाड किंवा शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली होती. मात्र, आता अन्य शक्यतांचीही पडताळणी केली जात आहे.

घरातील फ्रिज तसेच अन्य विद्युत उपकरणांमध्ये काही बिघाड झाला होता का, वायरिंगची स्थिती कशी होती, याची तपासणी करण्यात येत आहे. त्याचबरोबर चव्हाट गल्ली आणि परिसरातील विविध सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमधील फुटेज पोलिसांकडून संकलित केले जात आहे.

संशयास्पद व्यक्ती परिसरात कुठून आली, किती वेळ तेथे होती आणि घटनेनंतर कोणत्या दिशेने गेली, याचा मागोवा घेण्याचे काम सुरू आहे. घटनास्थळाकडे येणारे आणि तेथून बाहेर जाणारे मार्ग, दुकाने, घरे तसेच इमारतींवरील सीसीटीव्ही फुटेजचीही तपासणी केली जात आहे.

तपासासाठी नियुक्त तीन पथके स्वतंत्रपणे काम करत आहेत. एका पथकाकडून घटनास्थळावरील पुरावे आणि विद्युत यंत्रणेची तपासणी केली जात आहे. दुसरे पथक सीसीटीव्ही फुटेजची छाननी करत आहे, तर तिसरे पथक प्रत्यक्षदर्शी, शेजारी आणि संबंधित व्यक्तींकडून माहिती घेऊन घटनेपूर्वीच्या परिस्थितीची पडताळणी करत आहे.

आगीचे नेमके कारण आणि सीसीटीव्हीत दिसलेल्या संशयास्पद व्यक्तीचा घटनेशी काही संबंध आहे का, हे तपास पूर्ण झाल्यानंतर स्पष्ट होणार आहे.