- जागर विवेकाचा कार्यक्रम : मराठी संत व अंधश्रद्धा निर्मूलन विषयावर व्याख्यान
बेळगाव : मनापासून केलेली भक्ती हाच खरा देव आहे. केवळ माणसांतच नव्हे तर पशु पक्षी प्राणी यांच्यातही देव आहे असा मानवतेचा संदेश संतांनी दिला आहे, असे उद्गार निवृत्त माध्यमिक शिक्षक अर्जुनराव चौगुले यांनी काढले.
राज्य विकास मराठी संस्था, मुंबईच्या प्रेरणेने येथील प्रगतिशील लेखक संघ व अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने रविवारी (२० सप्टेंबर) आयोजित केलेल्या जागर विवेकाचा कार्यक्रमात मराठी संत व अंधश्रद्धा निर्मूलन याविषयावर झालेल्या व्याख्यानात चौगुले बोलत होते. बेळगांव जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष कृष्णा शहापूरकर अध्यक्षस्थानी होते.
अंनिसचे कार्याध्यक्ष शंकरराव चौगुले यांनी म्हटलेल्या अभंगाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. प्रारंभी अध्यक्ष कृष्णा शहापूरकर यांच्या हस्ते पुस्तक देऊन व्याख्याते चौगुले यांचा सन्मान करण्यात आला.
अर्जुनराव चौगुले यांनी आपल्या व्याख्यानात ज्ञानेश्वर, नामदेव, तुकाराम, गोरा कुंभार, चोखोबा, नरहरी सोनार आदी संतांचा जीवन परिचय करून देताना त्यांनी अंधश्रद्धा निर्मूलनासाठी केलेल्या कार्याची माहिती दिली.
अध्यक्षीय भाषणात कृष्णा शहापूरकर यांनी ज्ञानेश्वर तुकाराम ते गाडगेबाबापर्यंतच्या संतांनी समाजाला जोडण्याचे काम केले. पण आजच्या काळातील बागेश्वरबाबा, संग्राम भंडारेसारखे स्वयंघोषित संत, किर्तनकार राजकीय पक्षांची सुपारी घेऊन समाज तोडण्याचे काम करत आहेत, अशी टिका केली.
अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यवाह जोतिबा अगसीमनी यांनी प्रास्ताविक केले व शिवाजी हसनेकर यांनी आभार मानले.
गिरीश कॉंप्लेक्स मधील शहीद भगतसिंग सभागृहात झालेल्या या कार्यक्रमास विविध क्षेत्रातील कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.







