उत्तराखंड : केदारनाथहून चारधाम यात्रेसाठी निघालेल्या यात्रेकरूंना घेऊन जाणारे हेलिकॉप्टर रविवारी पहाटे रुद्रप्रयागच्या गौरीकुंड येथे कोसळून सात जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये पायलट आणि एका दोन वर्षांच्या मुलीचा समावेश आहे. गौरीकुंडपासून सुमारे ५ किमी अंतरावर असलेल्या गौरी माई खार्क येथे ही दुर्घटना घडली.

प्राप्त माहितीनुसार, हेलिकॉप्टर केदारनाथहून गुप्तकाशीला जात असताना हा अपघात झाला. खराब हवामानामुळे अपघात झाल्याचे सांगितले जात आहे. या अपघातातील मृतांमध्ये पायलटचाही समावेश आहे. या घटनेनंतर, प्रशासनाने तात्काळ बचावकार्य सुरू केले आणि विमान उड्डाण विभागाला (डीजीसीए) घटनेची माहिती दिली आहे. दरम्यान, चारधाम यात्रेदरम्यान याआधीही अनेक हेलिकॉप्टर अपघात झाले आहेत, ज्यामुळे यात्रेच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.