बेळगाव : बेळगाव तालुक्यातील धामणे एस. गावात बोअरवेल खोदकामाच्या वादातून शेतकरी व त्याच्या मुलावर तलवार आणि भाल्याने हल्ला झाल्याची गंभीर घटना घडली आहे. या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी सकाळी बोअरवेल खोदकामासाठी आलेले वाहन दुसऱ्याच्या जमिनीवर उभे केल्याच्या कारणावरून वाद निर्माण झाला. या वादाचे रूपांतर हिंसक हल्ल्यात झाले.
जीवाप्पा गावडे या शेतकऱ्यावर काही अज्ञात व्यक्तींनी तलवार आणि भाल्याने हल्ला केला. त्यांचा मुलगाही या हल्ल्यात जखमी झाला आहे. जखमी जीवाप्पा गावडे यांना तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.
काही समाजकंटक वारंवार त्यांच्या जमिनीवर डोळा ठेवून त्रास देत होते. यापूर्वीही वाद झाले होते. पुन्हा हल्ला होण्याची शक्यता असल्याने ग्रामीण पोलीस ठाण्याकडे संरक्षणाची मागणी करण्यात आली होती, मात्र त्याला मागणीला प्रतिसाद दिला नाही, असा आरोप अनिल गावडे यांनी केला आहे. ही घटना ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.








