- विद्यापीठांमधील रिक्त पदे भरण्याची मागणी
बेळगाव / प्रतिनिधी
राज्यातील उच्च शिक्षण व्यवस्थेत सुरू असलेल्या कथित बोगस पीएचडी रॅकेट आणि अतिथी अधिव्याख्यात्यांच्या नियुक्तीत होत असलेल्या गैरप्रकारांविरोधात आज बेळगावात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने (अभाविप) तीव्र आंदोलन छेडले. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर झालेल्या या निदर्शनांत शेकडो कार्यकर्त्यांनी सहभाग नोंदवून प्रशासनाचे लक्ष वेधले.
कर्नाटकात मोठ्या प्रमाणावर बनावट पीएचडी पदव्या तयार केल्या जात असल्याचा गंभीर आरोप यावेळी करण्यात आला. युजीसीच्या नियमानुसार संशोधन प्रक्रियेतून पदवी मिळवण्याऐवजी, पैशांच्या मोबदल्यात बनावट प्रमाणपत्रांची देवाणघेवाण होत असल्याचे अभाविपने सांगितले. कोप्पळ, विजयपूर, हावेरी, यादगीर आणि जमखंडी या भागांत अशा प्रकारांची संख्या जास्त असल्याचे नमूद करण्यात आले. तसेच इतर राज्यांतूनही बोगस पदव्या मागविल्या जात असल्याचा आरोप करण्यात आला. या रॅकेटमागील एजंटांवर तातडीने कारवाई करून त्यांना अटक करावी, अशी ठाम मागणी आंदोलनकर्त्यांनी केली.
दरम्यान, राज्यातील विद्यापीठांमधील रिक्त पदांच्या प्रश्नालाही अभाविपने अधोरेखित केले. राज्यातील ३२ विद्यापीठांमध्ये तब्बल ९,२९२ पदे रिक्त असून ती त्वरित भरण्याची आवश्यकता असल्याचे सांगण्यात आले. काही प्राचार्यांना देण्यात आलेल्या अधिकाराचा गैरवापर करून बेकायदेशीरपणे अतिथी अधिव्याख्यात्यांची नियुक्ती होत असल्याचा आरोपही करण्यात आला.
बनावट कागदपत्रे तयार करणाऱ्या प्राचार्यांना तात्काळ बडतर्फ करावे, तसेच घोटाळा उघडकीस येण्याच्या भीतीने राजीनामा देणाऱ्या अधिव्याख्यात्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी अभाविपचे शहर सचिव प्रथमगौडा पाटील यांनी केली. या आंदोलनात अभाविपचे शेकडो पदाधिकारी व सदस्य सहभागी झाले होते.







