• तक्रार होताच खंडणीचे गुन्हे ; राऊडी शीट उघडून होणार कठोर कारवाई

बेळगाव : यूट्यूब चॅनेल, सोशल मीडिया किंवा पत्रकार असल्याचा बनाव करून नागरिक, व्यापारी, शेतकरी तसेच सरकारी अधिकाऱ्यांना ब्लॅकमेल करून पैसे उकळणाऱ्यांविरोधात पोलीस विभागाने कठोर भूमिका घेतली आहे. अशा प्रकारचे कृत्य करणाऱ्या बनावट पत्रकार आणि यूट्यूबर्सविरुद्ध खंडणीचे गुन्हे दाखल करून त्यांची राऊडी शीट उघडली जाईल, असा कडक इशारा जिल्हा पोलीस अधीक्षक के. रामराजन यांनी दिला.

पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी सांगितले की, जिल्ह्यात काही जण यूट्यूबर्स किंवा सोशल मीडिया कार्यकर्त्यांच्या नावाखाली नागरिक, शेतकरी, व्यापारी तसेच विविध सरकारी विभागांतील अधिकाऱ्यांना बदनामीची धमकी देत पैशांची मागणी करत असल्याच्या तक्रारी पोलीस विभागाकडे येत आहेत. अशा प्रकारांना कोणतीही मुभा दिली जाणार नसून संबंधितांविरुद्ध खंडणीसह अन्य लागू कायद्यांनुसार कठोर कारवाई केली जाईल.

कोणीही व्यक्ती पत्रकार किंवा यूट्यूबर असल्याचे सांगून बदनामी करण्याची धमकी देत पैशांची मागणी करत असेल, तर नागरिकांनी आणि सरकारी अधिकाऱ्यांनी कोणतीही भीती न बाळगता तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करावी. तक्रार प्राप्त होताच आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

यापुढे पोलीस विभागाच्या पत्रकार परिषदांना केवळ अधिकृत आणि मान्यताप्राप्त माध्यमांच्या प्रतिनिधींनाच प्रवेश दिला जाईल. ब्लॅकमेलिंग, खंडणी किंवा अशा बेकायदेशीर उद्देशाने कार्य करणाऱ्या बनावट यूट्यूबर्स आणि तथाकथित पत्रकारांना कोणतीही सवलत दिली जाणार नाही, असा स्पष्ट इशाराही जिल्हा पोलीस अधीक्षक के. रामराजन यांनी दिला.