- जिल्हाधिकाऱ्यांकडून कुत्र्यांच्या स्थलांतर व पुनर्वसनासाठी तातडीने उपाययोजना
बेळगाव / प्रतिनिधी
बेळगाव शहरात वाढत चाललेल्या भटक्या कुत्र्यांच्या उपद्रवाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने ठोस उपाययोजना राबविण्यास सुरुवात केली आहे. शहरातील भटक्या कुत्र्यांचे शहराबाहेर स्थलांतर करण्याच्या दृष्टीने हालचाली वेगाने सुरू असून, याबाबत सविस्तर चर्चा करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी शुक्रवार, दि. ९ जानेवारी रोजी श्वानप्रेमी व श्वान कल्याण समितीची विशेष बैठक आयोजित केली आहे.
अलीकडेच आझादनगर परिसरात दोन वर्षांच्या चिमुकल्यावर भटक्या कुत्र्याने हल्ला करून त्याला गंभीर जखमी केल्याची घटना घडली होती. या आणि अशा इतर घटनांची गंभीर दखल घेत जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी भटक्या कुत्र्यांच्या प्रश्नावर तातडीने पावले उचलण्याचे संकेत दिले आहेत.
यासंदर्भात बोलताना जिल्हाधिकारी म्हणाले की, शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार श्वानप्रेमी आणि संबंधित समित्यांशी चर्चा करून त्यांच्या सूचना विचारात घेतल्या जात आहेत. जिल्ह्यात भटक्या कुत्र्यांच्या पुनर्वसनासाठी विशेष केंद्रांची उभारणी करण्यात आली असून, त्या ठिकाणी नोडल अधिकाऱ्यांची नियुक्तीही करण्यात आली आहे.
आतापर्यंत करण्यात आलेल्या सर्वेक्षणात जिल्ह्यात सुमारे २२ हजार १३० भटक्या कुत्र्यांची नोंद झाली असून, त्यांचे वर्गीकरण करून हिरेबागेवाडी येथील पुनर्वसन केंद्रात स्थलांतर करण्याचे नियोजन सुरू असल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली. या निर्णयामुळे शहरातील नागरिकांना भटक्या कुत्र्यांच्या त्रासातून दिलासा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.








