• १७ तासांत प्रवास पूर्ण ; अत्याधुनिक सुविधांसह सेवा लवकरच सुरू

बेळगाव : बेंगळुरू ते मुंबई या महत्त्वाच्या मार्गावर धावणाऱ्या स्लीपर वंदे भारत एक्स्प्रेसला रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी ग्रीन सिग्नल दिला असून, लवकरच ही अत्याधुनिक रेल्वे सेवेत दाखल होणार आहे. विशेष म्हणजे ही गाडी अवघ्या १७ तासांत बेंगळुरूहून मुंबईला पोहोचणार असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.

ही देशातील दुसरी वंदे भारत शयनयान एक्स्प्रेस ठरणार असून, केएसआर बेंगळुरू सिटी रेल्वे स्थानक ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) दरम्यान धावणार आहे. अद्याप अधिकृत वेळापत्रक जाहीर झाले नसले तरी हा प्रवास १६ तासांपेक्षा कमी वेळेत पूर्ण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

या मार्गासाठी दोन वंदे भारत शयनयान रेक तैनात करण्यात येणार असून, एक मुंबईहून तर दुसरा बेंगळुरूहून सुरू होईल. त्यामुळे दोन्ही महानगरांदरम्यान दररोज रात्रीची नियमित सेवा उपलब्ध होणार आहे.

रेल्वेमंत्र्यांनी खासदार पी. सी. मोहन यांना पाठवलेल्या पत्रातून या नव्या सेवेला मंजुरी दिल्याचे स्पष्ट केले आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी सुरू करण्यात येणाऱ्या या गाडीत अत्याधुनिक डबे, सुधारित सुरक्षा व्यवस्था, उच्च दर्जाची स्वच्छता आणि आरामदायी शयनयान सुविधा उपलब्ध असणार आहेत.

बेळगावमार्गे धावणारी ही सेवा सुरू झाल्यास उत्तर कर्नाटक व पश्चिम महाराष्ट्रातील प्रवाशांसाठी मोठी सोय होणार आहे.