• बेळगाव मार्गे प्रवास करणाऱ्या नागरिकांना दिलासा

बेळगाव / प्रतिनिधी

बेंगळूर ते मुंबई या प्रमुख शहरांना जोडणाऱ्या सुपरफास्ट रेल्वे सेवेला अखेर रेल्वे मंत्रालयाची मंजुरी मिळाली आहे. या निर्णयामुळे विशेषतः बेळगावमार्गे प्रवास करणाऱ्या नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी दिलेल्या माहितीनुसार, रेल्वे मंत्रालयाने त्यांना अधिकृत पत्राद्वारे या नवीन रेल्वे सेवेचा मंजुरी निर्णय कळविला आहे. नव्याने सुरू होणारी ही सुपरफास्ट रेल्वे मुंबई – दावणगिरी मार्गे हुबळी, बेळगाव अशी धावणार आहे.

जोशी यांनी मागील काही महिन्यांपासून या रेल्वे सेवेच्या मंजुरीसाठी सातत्याने प्रयत्न केले होते. १६ ऑक्टोबर रोजी त्यांनी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याशी याबाबत पत्रव्यवहार केला होता. त्यानंतर मंत्रालयाने २२ ऑक्टोबर रोजी अधिकृत कळवणी दिली.

बेंगळूर – मुंबई दरम्यान रोज मोठ्या प्रमाणावर प्रवासी, व्यापारी आणि कामगार प्रवास करतात. त्यामुळे या मार्गावर सुपरफास्ट रेल्वे सुरू झाल्याने दोन्ही शहरांदरम्यानचा प्रवास अधिक वेगवान आणि सोयीस्कर होणार आहे. तसेच तुमकूर, दावणगिरी, हावेरी, हुबळी, धारवाड आणि बेळगाव या प्रमुख शहरांतील व्यापाऱ्यांना थेट मुंबईशी रेल्वे जोडणी मिळणार आहे.

सध्या बेळगावमार्गे काही नियमित गाड्या धावत असल्या तरी नव्या सुपरफास्ट सेवेच्या सुरुवातीने लाखो प्रवाशांचा वेळ आणि प्रवास खर्च दोन्ही वाचणार आहेत. केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी या निर्णयाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी, रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव आणि राज्याचे रेल्वे राज्यमंत्री व्ही. सोमन्ना यांचे आभार मानले आहेत.