• अध्यक्षपदी डॉ. उमा कुलकर्णी

बेळगाव / प्रतिनिधी

बेळगुंदी येथे येत्या शनिवार, दि. १ फेब्रुवारी रोजी भव्य मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले असून हे संमेलन एकूण चार सत्रांत पार पडणार आहे. संमेलनाचे अध्यक्षपद ज्येष्ठ साहित्यिक व नामवंत अनुवादक डॉ. उमा कुलकर्णी भूषविणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे.

डॉ. उमा कुलकर्णी या मराठी साहित्यविश्वातील एक महत्त्वाच्या अनुवादक म्हणून ओळखल्या जातात. त्यांनी कन्नड साहित्यातील अनेक दर्जेदार साहित्यकृती मराठीत अनुवादित करून त्या मराठी वाचकांपर्यंत पोहोचवल्या आहेत. त्यांच्या अनुवाद कार्यात ज्ञानपीठ पुरस्कारप्राप्त लेखकांच्या साहित्याचाही समावेश आहे. या उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांना साहित्य अकादमीसह विविध मानाचे पुरस्कार लाभले आहेत. अनुवादासोबतच त्यांची काही स्वलिखित पुस्तकेही प्रकाशित झाली असून, त्या प्रामुख्याने अनुवाद साहित्यालाच अधिक प्राधान्य देतात.

अनुवाद करताना मूळ लेखकाची शैली, सांस्कृतिक पार्श्वभूमी आणि आशय अबाधित ठेवण्यावर त्यांचा विशेष भर असतो. अनुवाद ही केवळ भाषांतराची प्रक्रिया नसून विचारपूर्वक केलेले सर्जनशील कार्य आहे, असा त्यांचा ठाम दृष्टिकोन आहे. मूळ कृतीचा आशय व अर्थ प्रामाणिकपणे वाचकांपर्यंत पोहोचवणे हेच त्यांच्या साहित्यसेवेचे मुख्य ध्येय आहे.

मूळच्या बेळगावच्या असलेल्या डॉ. कुलकर्णी यांचा जन्म बेळगाव येथे झाला असून त्यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण शहापूर येथील सरस्वती विद्यालयात झाले आहे. सध्या त्या पुणे येथे वास्तव्यास आहेत. बेळगुंदीतील या साहित्य संमेलनामुळे साहित्यप्रेमींमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.