बेळगाव / प्रतिनिधी
मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या हस्ते ९ डिसेंबर रोजी बेळगावीतील सुवर्ण सौधच्या पश्चिम प्रवेशद्वारावर देशातील दुसऱ्या क्रमांकाच्या खादी राष्ट्रध्वजाचे अनावरण करण्यात आले. यावेळी उपस्थितांनी राष्ट्रगीताने राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली.
महात्मा गांधी यांनी बेळगाव काँग्रेस अधिवेशनाचे अध्यक्षस्थान भूषविले होते. त्या ऐतिहासिक घटनेच्या स्मरणार्थ ‘गांधी भारत’ हा देशभक्तीपर कार्यक्रम पार पडला. यानंतर सुवर्ण सौध येथे या विशाल ध्वजाच्या अनावरणाचा सोहळा आयोजित करण्यात आला.
७५ फूट लांब आणि ५५ फूट रुंद असलेल्या या भव्य राष्ट्रध्वजामुळे देशभक्तीची भावना उंचावल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. हा ध्वज तयार करण्यासाठी परिश्रम घेतलेल्या कलबुर्गी जिल्ह्यातील कमलापूर येथील विनोदकुमार रेवप्पा बम्मणावर यांचा सत्कारही यावेळी झाला.
मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी देशभक्ती, धर्मनिरपेक्षता आणि मानवतेच्या मूल्यांवर भर देत विद्यार्थ्यांमध्ये संविधानाबद्दल जागरूकता निर्माण करण्याचे सरकारचे प्रयत्न स्पष्ट केले.
उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी या ध्वजामुळे पुढील पिढीत राष्ट्रभक्तीची भावना वृद्धिंगत होईल असे सांगितले. तर सभापती यू. टी. खादर यांनी गांधीजींच्या पावन भूमीत असा कार्यक्रम होणे अभिमानास्पद असल्याचे म्हटले.
हा ध्वज केवळ एक प्रतीक नसून देशभक्तीची जाणीव जागवणारा शाश्वत संदेश असल्याचे संसदीय कामकाज व पर्यटन मंत्री एच. के. पाटील यांनी नमूद केले.
या कार्यक्रमाला विधानसभेचे उपसभापती रुद्रप्पा लमाणी, मंत्री डॉ. एच. सी. महादेवप्पा, मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर, सरकारचे मुख्य सचिव शालिनी रजनीश, आमदार अशोक पट्टण, सलीम अहमद, नसीर अहमद, जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन आदी मान्यवर उपस्थित होते.








