- गोडवा वाढविणार साखरेच्या माळा
बेळगाव / प्रतिनिधी
साडेतीन मुहूतपैिकी एक असलेला गुढीपाडवा दोन दिवसांवर येऊन ठेपल्याने ग्राहकांची बेळगाव बाजारात गर्दी उसळत असून खरेदीची लगबग सुरु झाली आहे. विविध वस्तूंचे स्टॉल बाजारपेठेत लक्ष वेधून घेत आहेत.
हिंदू नववर्षाचा प्रारंभ गुढी पाडव्याच्या सणाने होतो. चैत्र शुद्ध प्रतिपदेला गुढी उभारून नवीन वर्षाचे स्वागत होते. त्यामुळे गुढीसाठी लागणाऱ्या बांबूच्या काठ्या,साखरेच्या माळा, फुलांची माळ, कलश, तोरण, मिनी गुढीसह इतर साहित्य विक्रीसाठी दाखल झाले आहे. शहरातील बुरुड गल्ली, मारुती गल्ली, गणपत गल्ली परिसरात बांबूच्या काठ्यांची विक्री केली जात आहे. यावर्षी १०० रुपयांपासून २०० रुपयांपर्यंत बांबू उपलब्ध आहेत. घरासमोर अथवा फ्लॅटमध्ये गुढी उभारता येत नाही, अशा ग्राहकांना पर्याय म्हणून आकर्षक मिनी गुढी बाजारपेठेत विक्रीसाठी दाखल झाल्या आहेत. बाजारपेठेत अगदी चार फुटांपर्यंत तयार गुढ्या उपलब्ध आहेत. याला ग्राहकवर्गाची अधिक पसंती मिळत आहे. चार फुटांपासून तयार असलेली गुढी १५० ते ३०० रुपयांपर्यंत विकली जात आहे. सजवलेल्या रेडिमेड गुढी दर्जा व आकारानुसार १५० ते ८०० रुपयांपर्यंत उपलब्ध आहेत. गुढीच्या काठीवर साखरगाठीचा हार घालण्यात येत असल्याने त्यांना अधिक महत्त्व असते. बाजारात केसरी, पांढऱ्या, पिवळ्या, लाल, हिरव्या रंगाच्या गाठ्या उपलब्ध आहेत. यंदा रंगीबेरंगी साखरमाळा २० रुपयाला एक याप्रमाणे उपलब्ध आहेत. रेडिमेड गुढी उभी करताना साडी, भरजरी ब्लाऊज पीसचा वापर करतात. साडीचा वापर करताना तिची व्यवस्थित घडी घालणे आवश्यक असते. गडबडीच्या वेळी वेळ वाचवणारी तसेच गुढीला शोभणारी डिझायनर गुढीची साडी सध्या बाजारात उपलब्ध आहे. त्यामुळे नोकरदारवर्गाची रेडिमेड गुढीला अधिक पसंती मिळत आहे.
बाजारपेठेत पांगुळ गल्ली, गणपत गल्ली, मारुती गल्ली, खडेबाजार, काकतीवेस आदी ठिकाणी गुढीपाडव्यासाठी लागणाऱ्या साहित्याच्या खरेदीसाठी सकाळ आणि सायंकाळच्या सत्रात गर्दी होत आहे.शुभ मुहूर्त असल्याने सोने इलेक्ट्रॉनिक – इलेक्ट्रिक, वस्तू वाहने, घर खरेदी केले जाते. गुढीपाडव्या दिवशी होणारी गर्दी पाहता आधीच ॲडव्हान्स बुकिंग करून त्या दिवशी फक्त घरी नेऊन पूजा करण्याची तयारी सुरू आहे. त्यामुळे ॲडव्हान्स बुकिंग साठी शोरूम्स मध्ये गर्दी होत आहे.
यावर्षी सोन्याचा दर प्रचंड वाढला असला तरी गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या मात्र कमी नाही. गुढीपाडव्याला चांगला व्यवसाय व्हावा यासाठी व्यावसायिकांनी ही विविध ऑफर्स ग्राहकांना देऊ केल्या आहेत.
- वाहन खरेदीसाठी झुंबड
वाहनांच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढल्या असल्या तरी खरेदीसाठी झुंबड उडाली आहे. काही शोरूम मध्ये वाहने उपलब्ध नसल्याने काही दिवस थांबण्याचा सल्ला देण्यात आला आहे. आवडता रंग आणि मॉडेल उपलब्ध होण्यासाठी महिन्याभरापूर्वीपासून बुकिंग करण्यात आले होते.
दुचाकी सह चार चाकी व कमर्शियल वाहने खरेदीकडे नागरिकांचा कल आहे. इलेक्ट्रिक वाहने खरेदी करण्यासाठी ॲडव्हान्स बुकिंग करण्यात आल्याने यावर्षी त्यांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.