• पालकमंत्री जारकीहोळींचे निर्देश
  • सुवर्ण विधानसौध येथे घेतली आढावा बैठक

बेळगाव / प्रतिनिधी

बेळगाव जिल्ह्यातील विविध विकासकामे तातडीने पूर्ण करून प्रलंबित समस्यांचे त्वरित निवारण करावे, असे स्पष्ट निर्देश जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिले. बेळगाव येथील सुवर्ण विधानसौध येथे झालेल्या आढावा बैठकीत त्यांनी विविध विभागांच्या कामकाजाचा सविस्तर आढावा घेत प्रशासनाला ठोस सूचना दिल्या.

जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी समन्वयाने आणि नियोजनबद्ध पद्धतीने काम करण्याची गरज असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. बैठकीस जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, पोलीस आयुक्त, जिल्हा पंचायत मुख्य कार्यकारी अधिकारी, सहाय्यक आयुक्त तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

बैठकीदरम्यान रस्ते विकास, आरोग्य सुविधा आणि इतर नागरी समस्यांवर सविस्तर चर्चा झाली. प्रलंबित कामांबाबत विभागांमध्ये समन्वय वाढवून ती तातडीने पूर्ण करण्यावर भर देण्यात आला. नागरिकांना मूलभूत सुविधा वेळेत मिळाल्या पाहिजेत, यासाठी प्रशासनाने जबाबदारीने कार्य करावे, असेही पालकमंत्र्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, गोकाकहून हेलिकॉप्टरने थेट सुवर्ण विधानसौध येथे दाखल झाल्यानंतर बैठक आटोपून पालकमंत्री जारकीहोळी यांनी बेळगावचे आमदार असिफ शेठ आणि कित्तूरचे आमदार बाबासाहेब पाटील यांच्यासोबत बळ्ळारीकडे प्रयाण केले.