बेळगाव : आज शनिवार दि. १४ रोजी बेळगाव मिडिया असोसिएशनची बैठक श्री शंभू जत्तीमठ येथे घेण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी श्रीकांत काकतीकर उपस्थित होते.
बैठकीच्या प्रारंभी संघटनेच्या सदस्या अरुणा गोजे – पाटील यांचे सासरे प्रभाकर नारायण गोजे पाटील त्याचबरोबर अहमदाबाद येथील विमान दुर्घटनेत मरण पावलेल्या सर्वांना स्तब्धता पाळून श्रद्धांजली वाहण्यात आली. या बैठकीत बेळगाव येथील मराठी पत्रकारांच्या हितासंदर्भात व्यापक स्वरूपात चर्चा करून निर्णय घेण्यात आले. बैठकीत बेळगाव सीमाभागातील मराठी पत्रकार सरकारी सोयीसुविधा तसेच विविध योजनांपासून वंचित रहात आहेत. यासंदर्भात आम्ही सातत्याने गेली ६ वर्षे महाराष्ट्र आणि कर्नाटक सरकारकडे पत्रकारांना सरकारी योजनांचा लाभ मिळावा यासाठी प्रयत्न करत आहोत. महाराष्ट्र सरकारने अलिकडेच डिजिटल मिडियासंदर्भात धोरण जाहीर केले आहे. लवकरच महाराष्ट्रातील डिजिटल मिडिया क्षेत्रात कार्यरत असलेल्या पत्रकारांना या योजनेचा लाभ होणार आहे. सदर योजनेत बेळगाव सीमाभागातील पत्रकारांना याचा लाभ मिळावा यासाठी महाराष्ट्र सरकारबरोबरच कर्नाटक सरकारकडेही रितसर पाठपुरावा करण्याचा निर्णय घेण्यात आला.
महाराष्ट्र आणि कर्नाटक सरकारने बेळगाव सीमाभागातील पत्रकार व त्यांच्या कुटुंबियांना आरोग्य सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. पत्रकारांवर होणार्या हल्ल्यांची दखल घेत सरकारने पत्रकार सुरक्षा कायदा अंमलात आणावा. पत्रकारांना मोफत बस पास उपलब्ध करून द्यावेत. ६० वर्षांवरील पत्रकारांना निवृत्तीवेतन लागू करावेत. बेळगाव जिल्ह्यातील डिजिटल मिडियाला सरकारी जाहिराती मिळाव्यात. सीमाभागातील डिजिटल मिडियातील पत्रकारांना अधिस्वीकृती कार्ड देण्यात यावेत. संघटनेच्या त्याचप्रमाणे पत्रकारांच्या आर्थिक अडीअडचणी दूर करण्यासाठी संघटनेच्यावतीने संघटीतपणे योग्यत्यामार्गाने निधीसंकलनाबाबत निर्णय घेण्यासंदर्भात सविस्तर चर्चा करून एकमताने निर्णय घेण्यात आले.
पुढील काळात भारती श्रमजिवी पत्रकार संघ (दिल्ली) आणि मराठी पत्रकार परिषद, मुंबई अ. भा. मराठी पत्रकार डिजिटल मिडिया यांच्याशी संलग्नित संघटनेच्या ध्येय धोरणाला अनुसरून तसेच सदस्यत्व घेऊन काम करणे, संघटनेच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या सदस्यांवर तात्काळ कारवाई करणे आणि बेळगाव मिडिया असोसिएशनच्या माध्यमातून बेळगाव जिल्ह्यातील पत्रकारांच्या हितासंदर्भात आणि संघटनेच्या नियम आणि अटींशी बांधिलकी राहून कार्य करण्याचा सर्वांनी निर्धार जाहीर केला.
बैठकीला उपेंद्र बाजीकर, शेखर पाटील, रवी मालशेट, रवी जाधव, सुहास हुद्दार, अमृत बिर्जे, महादेव पवार, रोहन पाटील, संजय चौगुले, अविनाश सुतार उपस्थित होते.