बेळगाव / प्रतिनिधी

बेळगाव महापालिकेने मालमत्ता करात वाढ आणि कचरा संकलन शुल्काबाबत निर्णय घेतल्यानंतर, अनगोळमधील नागरिकांनी माजी नगरसेवक विनायक गुंजटकर यांच्या नेतृत्वाखाली महापालिका आयुक्तांना निवेदन सादर करून आपली नाराजी व्यक्त केली.

महापालिकेने सन २०२६-२७ साठी मालमत्ता करात ३ टक्के वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचा निषेध करण्यासाठी नागरिक आणि व्यापारी एकत्र आले होते. निवेदन महापालिका आयुक्त कार्तिक एम. यांना दिले गेले.

विनायक गुंजटकर म्हणाले, “गेल्या वेळी कचरा संकलन शुल्कासाठी व्यापाऱ्यांकडून अतिरिक्त कर आकारण्यात आला होता आणि आता पुन्हा कर वाढवण्यात आली आहे. वाढत्या महागाईत ही करवाढ म्हणजे जखमेवर मीठ चोळण्यासारखी आहे. कर न भरणाऱ्या व्यापाऱ्यांचे व्यवसाय बंद करण्याची धमकी दिली जात आहे. त्यामुळे ही वाढ तातडीने रद्द करावी, अन्यथा उग्र आंदोलन छेडले जाईल.”

स्थानिक नागरिकांनी महापालिका सदस्यांवर आरोप केला की, लोकांच्या समस्या सोडवण्याऐवजी दरवर्षी कर वाढवून जनतेवर आर्थिक बोजा टाकला जात आहे. तसेच, चौथ्या रेल्वे गेटचे काम सुरू असल्याने या भागातील वाहतूक कमी झाली असून त्याचा थेट परिणाम व्यापारावर झाला आहे, असे राजू पवार यांनी नमूद केले. महापालिकेच्या या धोरणाचा निषेध करत, ही करवाढ सामान्य जनता आणि व्यापाऱ्यांसाठी अन्यायकारक आहे, असे शिवानंद मलगान यांनी सांगितले.