चंदगड / प्रतिनिधी

महाराष्ट्र विधानसभेचे हिवाळी अधिवेशन सोमवारपासून नागपूर येथे सुरू झाले आहे. यादरम्यान सभागृहात बेळगाव चंदगड वेंगुर्ला मार्गाची तत्काळ दुरुस्ती व्हावी व या मार्गाचा राष्ट्रीय महामार्गात समावेश करावा, अशी मागणी चंदगडचे आमदार शिवाजी पाटील यांनी केली आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड विधानसभा मतदारसंघातील चंदगड तालुक्यातून जाणारा बेळगाव – वेंगुर्ला मार्गाच्या विकासासाठी गेल्या अनेक वर्षांपासून निधी उपलब्ध झालेला नाही. त्यामुळे सध्या या मार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. रस्त्याच्या दुरुस्तीसाठी तत्काळ निधी मंजूर करण्यात यावा, अशी मागणी केली. गेल्या काही वर्षात अपघातांचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. यामुळे दरवर्षी किमान १६० ते १७० निष्पाप लोकांचे नाहक बळी जात असून, हा मार्ग वर्दळीचा असल्याने यावरून मोठ्या प्रमाणात वाहनांची गर्दी असते; परंतु या राज्यमार्गाची रुंदी कमी असल्याने वाहतुकीची कोंडी होते व दिवसेंदिवस अपघातांचे प्रमाण वाढत चालले आहे. त्यामुळे बेळगाव – वेंगुर्ला राज्यमार्ग राष्ट्रीय महामार्ग करावा, त्यामुळे या मार्गाचा विकास होऊन अपघातांचे प्रमाण कमी होईल. त्याचबरोबर याचा चंदगड, गडहिंग्लज व आजरा तालुक्यांतील या रस्त्यालगतच्या गावांना व्यावसायिकदृष्ट्या मोठा फायदा होईल, अशी मागणी आमदार पाटील यांनी केली आहे.