- केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवरांची उपस्थिती.
बेळगाव : श्री दत्त पद्मनाभ पीठ, बेळगाव – कर्नाटक यांच्या वतीने पद्मश्री विभूषित अध्यात्म शिरोमणि सद्गुरु ब्रह्मेशानंद आचार्य स्वामीजींच्या गुरुपीठारोहण रजत महोत्सवी वर्षानिमित्त आज रविवार, दि. १८ रोजी सायंकाळी ६:०० वाजता मराठा मंदिर सांस्कृतिक भवन – बेळगाव येथे ‘गुरुः साक्षात् परब्रह्म’ या भव्य आध्यात्मिक सोहळ्याचे भव्य आयोजन करण्यात आले आहे.
श्री दत्त पद्मनाभ पीठ देव, देश व धर्म या त्रिसुत्रींच्या माध्यमातून धार्मिक, आध्यात्मिक, शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक अशा विविध क्षेत्रात दिव्य कार्य करत असताना गेल्या २५ वर्षांपासून सद्गुरु ब्रह्मेशानंद आचार्य स्वामीजींच्या दिव्य मार्गदर्शनाखाली वेद, संस्कृत, योग, अध्यात्म, संस्कार, धर्मजागृती, समाजसेवा आणि राष्ट्रसेवेच्या माध्यमातून सनातन संस्कृतीचा प्रसार राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर होत आहे. या गौरवशाली आध्यात्मिक कार्यासाठी भारत सरकार द्वारे पद्मश्री पुरस्कार पूज्य स्वामीजींना प्रदान करण्यात आला.
या सोहळ्यास केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक, बेळगाव दक्षिणचे आमदार अभय पाटील, महापौर प्रीती विनायक कामकर, सत्गुरु फाउंडेशन अध्यक्षा ॲड. ब्राह्मीदेवीजी, कर्नाटक विधान परिषदेचे माजी सदस्य मा. श्री. महांतेश कवठगीमठ, माजी आमदार – ॲड. अनिल बेनके, शिवप्रतिष्ठानचे नेते मा. श्री. किरण गावडे, उद्योजक मा. श्री. विनय बाळीकाई तसेच सामाजिक कार्यकर्ते मा. श्री. धनंजय जाधव आदि मान्यवर उपस्थित असणार आहेत.
आध्यात्मिक पर्व २०५० आत्मज्ञानातून विश्वकल्याणाकडे या संकल्पनेच्या माध्यमातून गुरुतत्त्वाचा महिमा, भारतीय संस्कृतीचे संवर्धन, आध्यात्मिक मूल्यांची जोपासना आणि समाजात संस्कारक्षम विचारांचा प्रसार हा या सोहळ्याचा प्रमुख उद्देश आहे.
गुरुपीठारोहणाच्या २५ वर्षांच्या गौरवशाली कार्यानिमित्त आयोजित या कार्यक्रमातून ‘देव, देश आणि धर्म’ या त्रिसूत्रीचा संदेश समाजापर्यंत पोहोचविण्यात येणार आहे तसेच या प्रसंगी तपोभूमी दिनदर्शिका २०२७ कर्नाटक आवृत्तीचे प्रकाशनही होणार आहे. हा सोहळा बेळगावसह कर्नाटकातील भाविकांसाठी विशेष पर्व ठरणार आहे.
या सोहळ्यास बेळगाव, खानापूर, निपाणी, चिकोडी तसेच गोवा, महाराष्ट्र व कर्नाटकातील सर्व शिष्य, भक्तगण, धर्मप्रेमी नागरिक व सर्व समाजबांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन श्री दत्त पद्मनाभ पीठ, बेळगाव – कर्नाटक यांच्या वतीने करण्यात आले आहे.








