
- डॉ. सुनीलकुमार लवटे, सिसिलिया कार्व्हालो, विवेकानंद गोपाल, सुरेंद्र दरेकर, रणधीर शिंदे, अनंत कदम यांचा समावेश
बेळगाव : राजारामबापू पाटील ललित कला अकादमी (महाराष्ट्र राज्य) आणि शब्दगंध कवी मंडळ संघ, बेळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने ‘लोकनेते राजारामबापू पाटील राष्ट्रीय ललित कला सन्मान २०२६’ पुरस्कार वितरण सोहळा उद्या शनिवार दि. १६ मे रोजी सायंकाळी ५ वाजता श्री तुकाराम महाराज सांस्कृतिक भवन येथे होणार आहे. राज्याचे माजी मंत्री तथा आमदार जयंतराव पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत विविध क्षेत्रांतील मान्यवरांना राष्ट्रीय पातळीवरील सन्मान प्रदान करण्यात येणार आहेत.

यंदाचा ‘लोकनेते राजारामबापू पाटील राष्ट्रीय ललित कला जीवन गौरव सन्मान’ प्रसिद्ध लेखक, अनुवादक आणि मराठी-हिंदी साहित्याचे अभ्यासक डॉ. सुनीलकुमार लवटे (कोल्हापूर) यांना जाहीर झाला आहे. एक लाख रुपये आणि सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
‘लोकनेते राजारामबापू पाटील राष्ट्रीय ललित कला सन्मान’ पुरस्कारासाठी कवयित्री व लेखिका सिसिलिया कार्व्हालो (वसई), दक्षिण भारतातील मराठी भाषेच्या अभ्यासपूर्ण योगदानाबद्दल संशोधक डॉ. विवेकानंद गोपाल (तंजावर, तामिळनाडू), कथासाहित्यातील योगदानाबद्दल कथाकार व कादंबरीकार डॉ. सुरेंद्र दरेकर (अहिल्यानगर) आणि समकालीन मराठी समीक्षेतील योगदानाबद्दल समीक्षक प्रा. डॉ. रणधीर शिंदे (शिवाजी विद्यापीठ) यांची निवड करण्यात आली आहे. प्रत्येकी २५ हजार रुपये आणि सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
‘लोकनेते राजारामबापू पाटील राष्ट्रीय ललित कला विशेष सन्मान’ लेखन व मराठी भाषेच्या प्रसारासाठी अनंत कदम (होळसमुद्र, कर्नाटक) यांना प्रदान करण्यात येणार असून, या पुरस्काराचे स्वरूप १५ हजार रुपये आणि सन्मानचिन्ह असे आहे.
प्रसिद्ध विचारवंत आणि संत साहित्याचे अभ्यासक डॉ. सदानंद मोरे यांच्या निवड समितीने पुरस्कारार्थींची निवड केली आहे. राष्ट्रीय पातळीवरील साहित्य, समीक्षा, संशोधन आणि मराठी भाषेच्या जतनासाठी कार्य करणाऱ्या मान्यवरांचा गौरव या सोहळ्यात करण्यात येणार असल्याने साहित्य क्षेत्रात उत्सुकता निर्माण झाली आहे.
राजारामबापू पाटील ललित कला अकादमीतर्फे स्व. राजारामबापू पाटील यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ गेल्या चार वर्षांपासून राष्ट्रीय स्तरावर हे सन्मान प्रदान केले जात आहेत. यापूर्वी पुणे, बडोदा आणि गोवा येथे पुरस्कार वितरण सोहळे पार पडले आहेत.







