- कर्तव्य बजावताना प्राणांचे बलिदान दिलेल्या पोलिसांना श्रद्धांजली
बेळगाव : देशाच्या सुरक्षेसाठी आणि नागरिकांच्या रक्षणासाठी कर्तव्य बजावताना प्राणांचे बलिदान देणाऱ्या पोलीस जवानांच्या स्मृतींना बेळगावात अभिवादन करण्यात आले. शहर आणि जिल्हा पोलीस विभागाच्या वतीने पोलीस परेड मैदानावर पोलीस हुतात्मा दिन सन्मानपूर्वक पाळण्यात आला.
या कार्यक्रमाला जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन, आयजीपी संदीप, जिल्हा पोलीस अधीक्षक के. रामराजन आणि शहर पोलीस आयुक्त प्रकाश निकम यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. मान्यवरांनी हुतात्मा स्मारकाला पुष्पहार अर्पण करून शहीद पोलिसांना आदरांजली वाहिली. यावेळी हवेत तीन फैरी झाडून वीर जवानांना मानवंदना देण्यात आली.

- ‘खाकी गणवेश म्हणजे जनतेचा विश्वास’; जिल्हाधिकाऱ्यांकडून पोलीस दलाच्या कर्तव्यनिष्ठेचा गौरव
कार्यक्रमात बोलताना जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी जिल्ह्यात गेल्या अडीच वर्षांपासून कार्यरत असताना पोलीस विभागाकडून मिळालेल्या सहकार्याचा विशेष उल्लेख केला. पोलिसांच्या कर्तव्यनिष्ठेचे महत्त्व स्पष्ट करताना त्यांनी, ‘खाकी का हर धागा एक कहानी कहता है, यह वर्दी नहीं केवल जनता का विश्वास है,’ या शायरीतून खाकी गणवेशामागील जबाबदारी आणि जनतेचा विश्वास अधोरेखित केला.

पोलीस कर्मचारी दिवस-रात्र दक्ष राहून नागरिकांच्या सुरक्षेसाठी कार्यरत असतात. त्यांच्या सततच्या पहाऱ्यामुळे समाजात शांतता आणि सुरक्षितता टिकून राहण्यास मदत होते, असे गौरवोद्गार जिल्हाधिकाऱ्यांनी काढले. देश आणि समाजाच्या रक्षणासाठी सर्वोच्च बलिदान देणाऱ्या पोलीस जवानांचे योगदान सदैव स्मरणात ठेवणे आवश्यक आहे. तसेच त्यांच्या कुटुंबीयांचा सन्मान करणे आणि त्यांच्या त्यागाची जाणीव ठेवणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी असल्याचेही त्यांनी नमूद केले.
या कार्यक्रमाला पोलीस विभागातील अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.








