बेळगाव : कामगारांना किमान वेतन लागू करावे आणि शेतकऱ्यांच्या जमिनींचे संरक्षण करावे, या प्रमुख मागण्यांसाठी सीआयटीयूच्या नेतृत्वाखाली बेळगावात ‘जेल भरो’ आंदोलन करण्यात आले. विविध क्षेत्रांतील शेकडो कामगारांनी शहरातून भव्य रॅली काढून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली. आंदोलन तीव्र होताच पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतले.

यावेळी सीआयटीयू नेत्या मंदा नेवगी यांनी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी २२ मे रोजी किमान वेतनाबाबत दिलेले आश्वासन अद्याप पूर्ण झाले नसल्याचा आरोप केला. सरकार मंत्रिमंडळ चर्चेच्या नावाखाली वेळकाढूपणा करत असून अंगणवाडी सेविका आणि स्वच्छता कर्मचाऱ्यांवर अन्याय होत असल्याचा संताप त्यांनी व्यक्त केला.

तसेच शेतकऱ्यांच्या जमिनी ताब्यात घेऊन त्या कॉर्पोरेट कंपन्यांना दिल्या जात असल्याचा आरोप करत शेतजमिनींचे संरक्षण करण्याची मागणी करण्यात आली. सरकारने कामगार आणि शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे गांभीर्याने लक्ष न दिल्यास राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी करत सरकारविरोधात संताप व्यक्त केला. परिस्थिती चिघळू नये यासाठी पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतले.