- गांजा , मटका आणि अवैध दारू विक्री प्रकरणी तिघांना अटक
बेळगाव : शहर आणि परिसरातील अवैध कृत्यांविरोधात बेळगाव पोलिसांनी कठोर कारवाई करत एकाच दिवसात तीन वेगवेगळ्या प्रकरणांत तीन आरोपींना अटक केली आहे. सीसीबी आणि स्थानिक पोलिसांनी केलेल्या या कारवाईत गांजा विक्री, मटका जुगार आणि अवैध दारू विक्रीविरोधात कारवाई करण्यात आली.

बेळगाव शहरातील रामतीर्थनगर येथील केएससीए मैदानाजवळ ऑटो रिक्षातून गांजा विक्री करण्याचा प्रयत्न करणाऱ्या अख्तर युसूफ शेख (वय ४२) याला सीसीबी पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून ५५ हजार रुपये किमतीचा १ किलो १४८ ग्रॅम गांजा तसेच २० हजार रुपये किमतीची ऑटो रिक्षा जप्त करण्यात आली.
दरम्यान, देवगिरी गावातील स्मशानभूमीजवळ मटका जुगार सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर काकती पोलिसांनी कारवाई केली. यावेळी लोकांकडून पैसे घेऊन मटका जुगार खेळवणाऱ्या भरमप्पा वैजू कुंबरगी (वय २८) याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडून रोख रक्कम आणि मटका जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले.

चंदूर गावातील होळेम्मादेवी ढाब्याजवळ परवानगीशिवाय दारू विक्री करणाऱ्या बलप्पा द्यमप्पा नित्तूर (वय ४२) याच्यावरही मरिहाळ पोलिसांनी कारवाई केली. त्याला अटक करून त्याच्याकडून व्हिस्कीचे ८८ टेट्रा पॅक जप्त करण्यात आले.
या तीनही प्रकरणांमध्ये माळमारुती, काकती आणि मरिहाळ पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल करून पुढील तपास सुरू आहे. अवैध कृत्यांविरोधात प्रभावी कारवाई करणाऱ्या पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या कामगिरीचे बेळगाव शहर पोलीस आयुक्तांनी कौतुक केले आहे.








