• वाहन मालकाला २५ हजारांचा दंड

बेळगाव : शहरात अल्पवयीन मुलाकडून कार चालविल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर वाहतूक पोलिसांनी संबंधित वाहन मालकाविरुद्ध कारवाई करत २५ हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे.

चन्नम्मा सर्कल परिसरातील गणेश मंदिराजवळ वाहतूक तपासणीदरम्यान पोलिसांना एक अल्पवयीन मुलगा कार चालविताना आढळला. यानंतर पोलिसांनी संबंधित वाहन ताब्यात घेतले तसेच मुलाला पोलीस ठाण्यात आणून त्याच्या पालकांना बोलावून घेतले.

या वेळी अल्पवयीन मुलांना वाहन चालविण्यास देणे हा कायद्याने गुन्हा असल्याची माहिती पालकांना देण्यात आली. या प्रकरणी मोटार वाहन कायद्यानुसार नोटीस बजावण्यात आली असून वाहन मालकाला न्यायालयामार्फत २५ हजार रुपयांचा दंड भरावा लागणार आहे.

वाहतूक पोलिसांनी पालकांना आपल्या अल्पवयीन मुलांच्या हाती वाहनांची चावी देऊ नये, असे आवाहन केले आहे. तसेच रस्ते सुरक्षेच्या दृष्टीने वाहतूक नियमांचे काटेकोरपणे पालन करणे आवश्यक असल्याचेही स्पष्ट करण्यात आले.

वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध पुढेही कठोर कारवाई सुरू राहणार असल्याचे सांगून नागरिकांनी जबाबदारीने वागावे, असे आवाहन पोलीस आयुक्तांनी केले आहे.