- उपाध्यक्ष सुनील हणमण्णावर यांच्याहस्ते लोकार्पण
- एनडब्ल्यूकेएसआरटीसीचा उपक्रम
बेळगाव : वायव्य कर्नाटक राज्य रस्ते वाहतूक मंडळाच्या (एनडब्ल्यूकेएसआरटीसी) चालक आणि वाहकांच्या सोयीसाठी बेळगाव मध्यवर्ती बसस्थानकात अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज विश्रामगृह सुरू करण्यात आले आहे. मंडळाचे उपाध्यक्ष सुनील हणमण्णावर यांच्या हस्ते या नव्या विश्रामगृहाचे लोकार्पण करण्यात आले.
यावेळी कर्तव्यावर आलेल्या चालक-वाहकांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले. उद्घाटनानंतर बोलताना सुनील हणमण्णावर यांनी सांगितले की, चालक-वाहकांना विश्रांतीसाठी योग्य सुविधा उपलब्ध नसल्याबाबत माध्यमांत प्रसिद्ध झालेल्या वृत्ताची गंभीर दखल घेऊन हे विश्रामगृह उभारण्यात आले आहे.
या विश्रामगृहात एकाच वेळी २० ते २५ कर्मचाऱ्यांना विश्रांती घेता येईल अशी व्यवस्था करण्यात आली असून गाद्या, शुद्ध पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहे आणि स्वतंत्र भोजनगृह (डायनिंग) अशा सर्व आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. घरासारखे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.
दिवस-रात्र सेवा बजावणाऱ्या चालक-वाहकांना आतापर्यंत विश्रांतीसाठी योग्य जागेचा अभाव जाणवत होता. मात्र, अवघ्या चार ते पाच दिवसांत हे हायटेक विश्रामगृह उभारण्यात आल्याने चालक-वाहकांनी मंडळ प्रशासनाचे आभार व्यक्त केले.
या कार्यक्रमाला बेळगाव विभागाचे नियंत्रक शशिधर मडीदेवरमठ यांच्यासह मंडळाचे वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी आणि चालक-वाहक मोठ्या संख्येने उपस्थित होते.








