- सीमा ठरावाच्या वादात खासदार जगदीश शेट्टर यांची भूमिका
बेळगाव : महापालिकेत कर्नाटकाच्या बाजूने सीमा ठराव मंजूर करण्याच्या मागणीवरून सुरू असलेल्या चर्चेत आता बेळगावचे खासदार जगदीश शेट्टर यांनी भूमिका स्पष्ट केली आहे. बेळगाव हा कर्नाटकचा अविभाज्य भाग असल्याने महापालिकेत स्वतंत्र ठराव मांडण्याची आवश्यकता काय, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
भाजपच्या पत्रकार परिषदेत बोलताना शेट्टर म्हणाले की, बेळगावमध्ये विविध भाषा बोलणारे नागरिक अनेक वर्षांपासून सलोख्याने राहत आहेत. त्यामुळे अनावश्यक वाद निर्माण करण्याऐवजी शहराच्या विकासाला प्राधान्य देणे अधिक महत्त्वाचे आहे.
सीमाप्रश्नाच्या संदर्भात सुरू असलेल्या चर्चेवर भाष्य करताना त्यांनी सांगितले की, बेळगावमध्ये दरवर्षी कर्नाटक विधिमंडळाचे अधिवेशन आयोजित केले जाते. त्यामुळे बेळगाव कर्नाटकचा भाग असल्याबाबत कोणतीही शंका राहात नाही. अशा परिस्थितीत स्वतंत्र ठराव मंजूर करण्याचा प्रश्नच उद्भवत नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
कन्नड संघटनांच्या मागणीनंतर प्रादेशिक आयुक्तांनी महापालिका प्रशासनाकडे अहवाल मागविल्याने हा विषय पुन्हा चर्चेत आला आहे. यावर प्रतिक्रिया देताना शेट्टर यांनी, ठराव मंजूर झाला नाही म्हणून सरकार महापालिका बरखास्त करेल, अशी भीती बाळगण्याचे कारण नसल्याचे स्पष्ट केले.
केवळ ठराव मंजूर करून प्रश्न सुटत नाहीत, असे सांगत त्यांनी विविध विकास प्रकल्पांचा उल्लेख केला आणि लोकप्रतिनिधींनी सीमा वादापेक्षा शहराच्या पायाभूत सुविधा, पाणीपुरवठा, वाहतूक आणि इतर विकासकामांवर अधिक लक्ष केंद्रित करावे, असे आवाहन केले.








