- राज्य सरकारचा आदेश ; १२ जुलै रोजी नागरिकांना मिळणार नोंदणी सेवांचा लाभ
बेळगाव : राज्य सरकारच्या निर्णयामुळे मालमत्ता नोंदणीसह विविध नोंदणी कामांसाठी नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. येत्या १२ जुलै २०२६ (रविवार) रोजी बेळगाव जिल्ह्यासह कर्नाटकातील सर्व उपनिबंधक (सब-रजिस्ट्रार) कार्यालये नियमितपणे सुरू राहणार असून, नागरिकांना नेहमीप्रमाणे सर्व सेवा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.
कर्नाटक सरकारने जारी केलेल्या अधिकृत आदेशानुसार हा निर्णय घेण्यात आला आहे. कर्नाटक नोंदणी नियम, १९६५ मधील प्रकरण ५ अंतर्गत नियम ५ मध्ये करण्यात आलेल्या दुरुस्तीनुसार, या रविवारीची सार्वजनिक सुटी रद्द करून तो दिवस ‘कामाचा दिवस’ म्हणून घोषित करण्यात आला आहे.
यामुळे मालमत्ता नोंदणी, मुद्रांक शुल्क भरणे तसेच नोंदणी विभागाशी संबंधित इतर तातडीचे व्यवहार नागरिकांना रविवारीही करता येणार आहेत. आठवड्याच्या इतर दिवशी वेळेअभावी कामे पूर्ण करू न शकणाऱ्या नागरिकांसाठी हा निर्णय विशेष लाभदायी ठरणार आहे.
महसूल विभागाने जारी केलेल्या अधिसूचनेत नागरिकांनी या विशेष सुविधेचा लाभ घेत आपल्या प्रलंबित नोंदणीसंबंधित कामांचा वेळेत निपटारा करून घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.








