• आपत्कालीन परिस्थितीत लोकांना वाचवण्याचा प्रात्यक्षिक सराव
  • बचावकार्याची धडपड, सुरक्षा यंत्रणांची सज्जता अधोरेखित

बेळगाव : दुपारच्या सुमारास जिल्हा रुग्णालय परिसरात अचानक स्फोटासारखा आवाज आणि धुराचे लोट पसरल्याने एकच खळबळ उडाली. रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांनी घाबरून बाहेर धाव घेतली, तर काही ठिकाणी जखमी पडल्याचे दृश्य दिसून आले. क्षणभर बॉम्ब हल्ल्याची भीती निर्माण झाली होती.

घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल, एसडीआरएफ, नागरी संरक्षण, रेड क्रॉस आणि होमगार्डच्या पथकांनी सायरन वाजवत घटनास्थळी धाव घेतली. धुराने भरलेल्या विभागातून श्वसन उपकरणांच्या साहाय्याने जवानांनी अडकलेल्या रुग्णांना सुरक्षित बाहेर काढले. गंभीर जखमींना तातडीने हलवण्याचा तसेच काहींना घटनास्थळीच प्रथमोपचार देण्याचा सराव करण्यात आला.

मात्र, ही घटना प्रत्यक्ष हल्ला नसून आपत्कालीन परिस्थितीत लोकांना वाचवण्याचा प्रात्यक्षिक सराव असल्याचे स्पष्ट झाले. आपत्तीच्या वेळी घाबरून न जाता योग्य प्रतिसाद देणे आणि विविध यंत्रणांमध्ये समन्वय राखणे किती महत्त्वाचे आहे, याची जाणीव करून देण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात आला.

या वास्तवदर्शी सरावामुळे नागरिक क्षणभर दचकले असले, तरी सुरक्षा यंत्रणांची तत्परता आणि तयारी पाहून समाधान व्यक्त करण्यात आले.