- खून प्रकरणातील फरार आरोपी गांजासह अटकेत
- गोव्यातून गांजा आणून विक्रीचा प्रयत्न उधळला
- लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त ; एनडीपीएस कायद्यांतर्गत गुन्हा
बेळगाव : शहर गुन्हे शाखेने (सीसीबी) केलेल्या धडक कारवाईत खून प्रकरणातील फरार आरोपीला गांजासह अटक करण्यात आली आहे. गोव्यातून गांजा आणून बेळगावात विक्री करण्याच्या तयारीत असताना पोलिसांनी सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. या कारवाईत अंमली पदार्थांसह मोबाईल फोन असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
सीसीबीचे पोलीस निरीक्षक मंजुनाथ नायक यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने जयनगर, पंतबाळेकुंद्री येथील रहिवासी आकाश दिलीप दोडमणी याला अटक केली. तपासादरम्यान मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे २४ जुलै २०२६ रोजी जांबोटी रस्त्यावर छापा टाकण्यात आला.
पोलिसांच्या माहितीनुसार, आकाश दोडमणी हा कार्तिक शिरगुप्पी यांच्या मदतीने गोव्यातून गांजा आणून त्याची विक्री करण्याच्या तयारीत होता. कारवाईदरम्यान त्याच्याकडून सुमारे १ किलो ७०४ ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला असून त्याची किंमत सुमारे ८० हजार रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले. याशिवाय ११ हजार रुपये किमतीचे दोन मोबाईल फोनही जप्त करण्यात आले आहेत.
तपासात आकाश दोडमणी हा बेळगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात नोंद असलेल्या खून तसेच अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत दाखल गुन्ह्यात (क्र. १३७/२०२६) फरार असल्याचेही निष्पन्न झाले. त्याच्याविरुद्ध आता एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, अंमली पदार्थांच्या या रॅकेटमध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा तपास सीसीबीकडून सुरू आहे.







