• चालत्या रेल्वेतून घसरलेल्या वृद्धाचे प्राण वाचवले

बेळगाव / प्रतिनिधी

बेळगाव रेल्वे स्थानकावर आरपीएफच्या सतर्कतेमुळे एक मोठा अपघात टळला. उचगावनजीक बसुर्ते गावातील बाळाराम गंगाराम कुंभार (वय ५५) हे आपली नात लक्ष्मी राजाराम कुंभार हिला सोडण्यासाठी रेल्वे स्थानकावर आले होते.

म्हैसूर-अजमेर एक्सप्रेस (गाडी क्रमांक १६२१०) ही गाडी बेळगावहून सुटत असताना, ते घाईगडबडीत चालू गाडीतून खाली उतरू लागले. या प्रयत्नात त्यांचा तोल गेला आणि ते रेल्वे प्लॅटफॉर्म आणि धावत्या ट्रेनमधील अरुंद जागेत अडकले. हा जीवघेणा प्रसंग पाहून आरपीएफ हेड कॉन्स्टेबल सी. आय. कोप्पद यांनी कोणताही विलंब न लावता, अत्यंत धाडसाने त्या ठिकाणी धाव घेतली आणि त्या व्यक्तीला प्लॅटफॉर्मच्या दिशेने ओढून सुरक्षितपणे बाहेर काढले. या दुर्घटनेतून त्यांना सुखरूप वाचवल्यानंतर प्रथमोपचार देण्यात आले.

हेड कॉन्स्टेबल कोप्पद यांची सतर्कता आणि प्रसंगावधानामुळे ५५ वर्षीय बाळाराम कुंभार यांचा जीव वाचला. त्यांच्या या उत्कृष्ट कामगिरीबद्दल रेल्वे प्रशासनातर्फे अभिनंदन केले जात आहे.