बेळगाव / प्रतिनिधी
बसुर्ते गावातील शेतकऱ्यांनी जलाशयासाठी संपादित जमिनीचा योग्य मोबदला तात्काळ मिळावा, यासाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार निदर्शने केली. २ दिवसांत नुकसानभरपाई न दिल्यास जलाशयाचे काम थांबवण्याचा इशाराही त्यांनी दिला.
बेळगाव तालुक्यातील बसुर्ते येथे जलाशय उभारण्यासाठी सुमारे ८० एकर जमीन संपादित करण्यात आली आहे. शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की, पिकांचे आणि विहिरींचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असूनही उचित नुकसानभरपाई मिळालेली नाही. या पार्श्वभूमीवर काल राणी चन्नम्मा सर्कल येथे त्यांनी धरणे आंदोलन करत प्रशासनाचा निषेध नोंदवला होता.
यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी आज या विषयावर सविस्तर चर्चा करण्यासाठी बैठक आयोजित करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, जिल्हाधिकारी इतर कामात व्यस्त असल्याचे कारण देत बैठक रद्द करण्यात आली. या निर्णयामुळे संतप्त शेतकऱ्यांनी डीसी कार्यालयासमोर नाराजी व्यक्त केली.
शेतकऱ्यांनी जेसीबीच्या कामामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले असून मेहनतीने खोदलेल्या विहिरी उद्ध्वस्त झाल्या आहेत. शेतीच उपजीविकेचे साधन असताना जमीनच गेल्यास कुटुंब कसे सांभाळायचे असा प्रश्न उपस्थित केला.
काही महिलांनी भावनिक होऊन, “आम्ही आज बैठकीला जाणार नाही,” असे सांगत प्रशासनाच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त केली.
यावेळी शेतकऱ्यांनी स्पष्ट इशारा दिली की, २ दिवसांत नुकसानभरपाई मिळाली तरच जलाशयाचे काम सुरू राहील; अन्यथा संपूर्ण काम बंद पाडले जाईल. या आंदोलनात बसुर्ते गावातील शेतकरी व स्थानिक शेतकरी नेते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

 
        

 
            




