• शंभर नागरिकांनी घेतला लाभ

पिरणवाडी : बनशंकरी महिला मंडळ, पिरणवाडी यांच्या वतीने शुक्रवार, दि. ७ ऑगस्ट रोजी विनायक नगर येथील विनायक मंदिरात सकाळी १० ते दुपारी २ वाजेपर्यंत आयोजित करण्यात आलेल्या आरोग्य तपासणी व नेत्र तपासणी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या शिबिराचा सुमारे शंभर नागरिकांनी लाभ घेतला..

शिबिरात सामान्य तपासणी, रक्तदाब, मधुमेह, हृदयरोग, कावीळ, अर्धांगवायू, दमा, लिव्हरचे आजार, मूत्रपिंडाचे विकार, हाडांच्या सांध्यांचे विकार, थायरॉईड, त्वचारोग, मूळव्याध तसेच बालरोग, स्त्रीरोग व क्षयरोगासंबंधी तपासण्या करण्यात आल्या. तसेच नेत्र तपासणी करून आवश्यक त्या नेत्र उपचारांबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

‘डॉ. अग्रवाल नेत्रदर्शन’चे श्री. उदयकुमार, श्रीमती श्रीदेवी (ऑप्टोमेट्रिस्ट) व श्री. नरेंद्र बिर्जे (तंत्रज्ञ) तसेच ‘आदिवीर’ मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, मच्छेचे डॉ. पद्मराज पाटील, डॉ. विद्या पी. पाटील, डॉ. नवाज मुल्ला व त्यांच्या कर्मचारीवर्गाने तपासणी व उपचार सेवा दिली.

शिबिर यशस्वी होण्यासाठीमहिला मंडळाच्या अध्यक्षा सौ. जयश्री यल्लप्पा मिरजी, सचिव वैशाली लक्ष्मण हुल्लोळी, सदस्य यल्लव्वा कलसप्पान्नावर, साधना शिवाजी साकळकर आणि मेघा संतोष नौकुडकर यांच्यासह मंडळाच्या सदस्यांनी परिश्रम घेतले. शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी समाजसेविका माधुरी जाधव यांचे विशेष सहकार्य लाभले.