• अन्यथा २६ जानेवारीला रास्तारोको
  • बुरुड कॉलनी रहिवासी संघाचे आंदोलन
  • सर्व निवडणुकांवर बहिष्कार टाकण्याचा इशारा

बेळगाव / प्रतिनिधी

बेळगावातील नेहरू नगर येथील बुरुड कॉलनीत मूलभूत सुविधांचा अभाव कायम असल्याने रहिवासी संतप्त झाले आहेत. एका आठवड्यात पायाभूत सुविधा उपलब्ध न झाल्यास २६ जानेवारी रोजी रस्ता रोखून आंदोलन करण्याचा तसेच आगामी सर्व निवडणुकांवर बहिष्कार टाकण्याचा इशारा कॉलनीवासीयांनी दिला आहे.

या मागणीसाठी आज राणी चन्नम्मा सर्कल येथे बुरुड कॉलनीतील नागरिकांनी जोरदार निदर्शने केली. कॉलनीमध्ये ड्रेनेज, रस्ते, पिण्याचे पाणी व स्वच्छतेच्या समस्या अत्यंत गंभीर असून, दूषित सांडपाणी थेट घरांमध्ये शिरत असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

३० ते ३५ वर्षांपूर्वी सांडपाणी निर्मूलन मंडळाकडून येथे घरे देण्यात आली; मात्र त्यानंतर कोणतीही पायाभूत सुविधा विकसित करण्यात आल्या नाहीत, असा आरोप रहिवाशांनी केला. निवडणुकीपुरते दिसणारे लोकप्रतिनिधी केवळ आश्वासने देतात, नगरसेवक व संबंधित विभागांकडे वारंवार पाठपुरावा करूनही ठोस उपाययोजना होत नसल्याची नाराजी आंदोलकांनी व्यक्त केली.

कॉलनीतील रहिवासी रमेश कुडची यांनी सांगितले की, ३०-४० वर्षांपूर्वी बांधलेले गटार आज पूर्णपणे अपुरे ठरले आहे. पावसाळ्यात परिस्थिती अधिकच भयावह होत असून, नाले भरून वाहत असल्याने परिसर सांडपाण्याच्या विळख्यात अडकतो. महिलांनीही स्वच्छतेच्या प्रश्नावर तीव्र संताप व्यक्त केला.

“आम्ही गेली ३६ वर्षे नियमित कर भरत आहोत; मात्र महानगरपालिकेकडून कोणत्याही मूलभूत सुविधा दिल्या जात नाहीत,” अशी ठाम भूमिका नागरिकांनी मांडली. एकमेकांवर जबाबदारी ढकलली जात असून, प्रत्यक्षात विकासाकडे पूर्णपणे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करण्यात आला.

शेवटी या सर्व मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आले. यावेळी नेहरू नगर बुरुड कॉलनीतील रहिवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते.