• अथणी परिसरातील घटना

अथणी : शहराबाहेरील सुनगार भाटीजवळील दगडखाणीत पोहताना १६ वर्षीय मुलाचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना शनिवारी सकाळी घडली. समर्थ पानलकर असे मृत मुलाचे नाव असून तो मित्रांसोबत पोहण्यासाठी गेला होता.

मिळालेल्या माहितीनुसार, समर्थ आपल्या मित्रांसह दगडखाणीत पोहण्यासाठी गेला होता. पाण्याचा अंदाज न आल्याने तो खोल पाण्यात गेला आणि बुडाला. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिक, नातेवाईक आणि अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले.

शोधमोहीमेदरम्यान घटनास्थळी समर्थची चप्पल आणि कपडे आढळून आले. त्यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी पाण्यात शोधकार्य सुरू करून मृतदेह बाहेर काढला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून समर्थच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या प्रकरणाची नोंद अथणी पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.