बेळगाव : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सामाजिक बांधिलकी जपत श्री सार्वजनिक एकदंत युवक मंडळ एसटीएम संचलित श्री दुर्गाशक्ती महिला मंडळ, समर्थ नगर यांच्या वतीने अनोखा उपक्रम राबविण्यात आला. नंदन मक्कळधाम आश्रमातील लहान मुलांच्या हस्ते तसेच श्री मुरगेंद्रगौडा पाटील यांच्या शुभहस्ते गणेशोत्सवाची मुहूर्तमेढ करण्यात आली.

यावेळी कोनवाळ गल्ली येथील गजराज सेवेकरी भजनी मंडळाच्या युवकांनी भक्तिमय वातावरणात आरती सादर केली. कार्यक्रमादरम्यान गल्लीतील नागरिकांच्या वतीने श्री मुरगेंद्रगौडा पाटील, गजराज सेवेकरी भजनी मंडळ तसेच नंदन मक्कल धाम आश्रमातील मुलांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.

यावेळी मुरगेंद्रगौडा पाटील यांनी आश्रमातील मुलांना देणगी स्वरूपात मदत केली. मंडळाने गणेशोत्सवाच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जपण्याचा घेतलेला पुढाकार कौतुकास्पद असल्याचे त्यांनी सांगितले. इतर गणेश मंडळांनीही या उपक्रमातून प्रेरणा घेऊन उत्सवाच्या माध्यमातून विविध सामाजिक कार्य हाती घ्यावे, असे आवाहन त्यांनी केले.

गल्लीतील नागरिकांच्या वतीने आश्रमातील मुलांना देणगी देण्यात आली. तसेच उपस्थित बालकांना चॉकलेट आणि लाडूचे वाटप करण्यात आले.

या उपक्रमाला गल्लीतील नागरिक, महिला तसेच बालगोपालांचा मोठा सहभाग लाभला. भक्तिमय वातावरणात पार पडलेल्या या कार्यक्रमातून गणेशोत्सवाच्या निमित्ताने सामाजिक संवेदनशीलतेचा संदेश देण्यात आला.