खानापूर : तालुक्यातील जुन्या पुलाजवळ दुचाकीसमोर अचानक कुत्रा आल्याने झालेल्या अपघातात दोन युवक गंभीर जखमी झाले. अपघातानंतर त्याच मार्गावरून प्रवास करणारे माजी आमदार अरविंद पाटील यांनी तातडीने मदतीसाठी धाव घेत जखमींना रुग्णालयात दाखल केले.
बेळगावच्या उद्यमबाग येथून काम आटोपून कारलगा गावाकडे परतत असताना काशीनाथ रावळू आणि गोरे हे दोघे युवक दुचाकीवरून जात होते. यावेळी अचानक समोर कुत्रा आल्याने दुचाकीवरील त्यांचे नियंत्रण सुटले आणि ते रस्त्यावर पडून गंभीर जखमी झाले.
याचवेळी त्या मार्गावरून जात असलेल्या माजी आमदार अरविंद पाटील यांनी रस्त्यावर जखमी अवस्थेत पडलेले युवक पाहताच तातडीने आपले वाहन थांबवले. त्यांनी जखमींना प्राथमिक मदत देत त्यांना स्वतःच्या वाहनातून खानापूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले.
वेळेवर मदत मिळाल्यामुळे जखमींना तातडीने उपचार सुरू करता आले. माजी आमदार अरविंद पाटील यांनी दाखवलेल्या तत्परतेचे आणि सामाजिक बांधिलकीचे परिसरातून कौतुक करण्यात येत आहे.







