- तलवार आणि चाकूसह दोघांना अटक
बेळगाव : शहरातील वाढत्या गुन्हेगारी घटनांना आळा घालण्यासाठी बेळगाव शहर पोलिसांच्या ‘अँटी-स्टॅबिंग स्क्वॉड’कडून विशेष तपासणी मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेदरम्यान पोलिसांनी बेकायदेशीररीत्या तलवार आणि चाकू बाळगणाऱ्या दोघांना अटक केली आहे.
शहरातील विविध भागांत दुचाकी वाहनांची तपासणी करण्यात येत असून संशयित व्यक्तींवर विशेष लक्ष ठेवण्यात येत आहे. वाहनांच्या डिक्कीमध्ये चाकू, जांबिया तसेच इतर धारदार शस्त्रे लपवून नेली जात आहेत का, याची तपासणी ‘अँटी-स्टॅबिंग स्क्वॉड’कडून केली जात आहे.
या धडक कारवाईदरम्यान दोन जणांकडून तलवार आणि चाकू जप्त करण्यात आले असून त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. शहरात कायदा व सुव्यवस्था कायम राखण्यासाठी अशा प्रकारच्या मोहिमा पुढेही सुरू राहणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
संशयास्पद हालचाली, व्यक्ती किंवा वाहन आढळल्यास नागरिकांनी तातडीने ११२ या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधून माहिती द्यावी, असे आवाहन बेळगाव पोलिसांकडून करण्यात आले आहे.








