- मुलींच्या गटात सेंट झेवियर्स तर मुलांच्या गटात सेंट पॉल्स संघ विजेता
बेळगाव : सार्वजनिक शिक्षण खात्यातर्फे आयोजित आणि कॅन्टोन्मेंट बोर्ड उर्दू शाळेच्या वतीने घेण्यात आलेल्या कॅम्प विभागीय माध्यमिक आंतरशालेय मुला-मुलींच्या फुटबॉल स्पर्धेत सेंट झेवियर्स आणि सेंट पॉल्स हायस्कूल संघांनी विजेतेपद पटकावले.
मुलींच्या गटातील अंतिम सामन्यात सेंट झेवियर्स हायस्कूलने गतविजेत्या सेंट जोसेफ हायस्कूलवर चुरशीच्या लढतीत सडन डेथमध्ये ८-७ अशी मात करत विजेतेपद मिळविले. निर्धारित वेळेत सामना गोलशून्य बरोबरीत राहिल्यानंतर पेनल्टी शूटआउटचा आधार घेण्यात आला. त्यात दोन्ही संघांनी प्रत्येकी चार गोल करत ४-४ अशी बरोबरी साधली. त्यानंतर सडन डेथमध्ये सेंट झेवियर्सने ४-२ असा विजय मिळवत जेतेपदावर नाव कोरले.
कॅम्प येथील सेंट पॉल्सच्या मैदानावर झालेल्या या सामन्यात दोन्ही संघांनी सुरुवातीपासून आक्रमक खेळ केला. मध्यंतरापर्यंत एकही गोल झाला नाही. दुसऱ्या सत्रातही दोन्ही संघांच्या आघाडीच्या खेळाडूंनी गोल करण्यासाठी प्रयत्न केले, मात्र निर्धारित वेळेत गोल न झाल्याने सामना पेनल्टी शूटआउटपर्यंत रंगला.
मुलांच्या गटातील अंतिम सामन्यात सेंट पॉल्स हायस्कूलने सेंट झेवियर्स हायस्कूलवर २-० असा विजय मिळवत अजिंक्यपद पटकावले. सेंट पॉल्सकडून अब्दुल मतीन आणि नेवीन पत्की यांनी प्रत्येकी एक गोल नोंदवत संघाच्या विजयात मोलाची भूमिका बजावली.
स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभात शहर पीईओ जे. बी. पटेल आणि मुख्याध्यापिका फरिदा बिस्ती यांच्या हस्ते विजेत्या व उपविजेत्या संघांना आकर्षक चषक आणि प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.
यावेळी कॅम्प विभाग शारीरिक क्रीडा संघटनेचे अध्यक्ष नागराज भगवंतन्नवर, प्रशांत देवदानम, अँथोनी डिसोजा, स्पर्धा सचिव साकीब बेपारी, प्रकाश बजंत्री, इम्रान बेपारी, रविशंकर मालशेट आणि मानस नायक आदी उपस्थित होते.








