• सीआयटीयू संघटनेचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन

बेळगाव / प्रतिनिधी

अंगणवाडी सेविकांवर लादण्यात आलेल्या बीएलओ (बूथ लेव्हल ऑफिसर) कामातून त्यांना सवलत द्यावी, या मागणीसाठी सीआयटीयू संघटनेच्या वतीने आज बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार निदर्शने करण्यात आली.

बेळगाव जिल्ह्यातील अनेक भागांत जेल जॅमरच्या प्रभावामुळे मोबाईल व इंटरनेट सेवा सातत्याने खंडित होत असल्याने बीएलओ म्हणून कार्यरत असलेल्या अंगणवाडी सेविकांना ऑनलाईन माहिती अपलोड करताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. अशा परिस्थितीतही सेविकांना स्वतःच्या खर्चाने इंटरनेट सुविधा वापरून आयसीडीएसचे नियमित काम पार पाडावे लागत असून, केवळ कामात विलंब झाल्याचे कारण देत तहसीलदारांकडून नोटिसा बजावल्या जात असल्याचा आरोप आंदोलकांनी केला.

तांत्रिक साधने उपलब्ध नसताना ‘मॅपिंग’सारखे गुंतागुंतीचे काम सेविकांवर लादणे हे अन्यायकारक व अव्यवहार्य असल्याचे सीआयटीयू संघटनेने स्पष्ट केले. पायाभूत सुविधांच्या कमतरतेसाठी अंगणवाडी सेविकांनाच जबाबदार धरून त्यांच्यावर मानसिक दबाव टाकला जात असल्याचा आरोपही करण्यात आला.

प्रशासनाने तातडीने नोटिसा मागे घ्याव्यात, मॅपिंगच्या कामातून सवलत द्यावी किंवा योग्य प्रशिक्षण व शासकीय साधनसामग्री उपलब्ध करून द्यावी, अशी ठाम मागणी यावेळी करण्यात आली. मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्यास पुढील काळात आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशारा सीआयटीयूच्या अध्यक्षा मंदा नेवगी यांनी दिला.

या आंदोलनात एम. एस. बडिगेर, एम. बी. मोरे, के. एम. बद्री, पी. एस. हिरेमठ, उल्का केपरकर, एस. ए. डोंगरगांवी, एल. के. तहसीलदार, सी. एन. गडकरी यांच्यासह अनेक कार्यकर्ते सहभागी झाले होते.