- रहिवाशांच्या पाठपुराव्याला यश
बेळगाव : गेल्या अनेक वर्षांपासून दुरुस्तीच्या प्रतीक्षेत असलेल्या गुड्सशेड रोडच्या तात्पुरत्या दुरुस्तीच्या कामाला अखेर सुरुवात झाली आहे. जेसीबीच्या साहाय्याने रस्ता खोदून खड्डे बुजविण्याचे काम हाती घेण्यात आले असून, त्यामुळे स्थानिक रहिवासी आणि वाहनचालकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. मात्र, तात्पुरत्या दुरुस्तीऐवजी रस्त्याचे कायमस्वरूपी काम करण्यात यावे, अशी मागणी जोर धरत आहे.
गुड्सशेड रोडची गेल्या अनेक वर्षांपासून अत्यंत दयनीय अवस्था झाली होती. रस्त्यावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडल्याने वाहनचालकांसह नागरिकांना ये-जा करताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. पावसाळ्यात या खड्ड्यांमध्ये पाणी साचल्याने परिस्थिती आणखी बिकट होत होती.
या समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी शास्त्रीनगर, गुड्सशेड रोड, संत सेना रोड, आठल्ये गल्ली, कपिलेश्वर कॉलनी आणि परिसरातील रहिवाशांनी महानगरपालिकेकडे सातत्याने पाठपुरावा केला. मात्र, अनेकदा मागणी करूनही दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले नव्हते.
अखेर रहिवाशांनी जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांची भेट घेऊन गुड्सशेड रोडची दुरवस्था त्यांच्या निदर्शनास आणून दिली. नागरिकांची समस्या जाणून घेतल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतः रस्त्याची पाहणी करण्याचे आश्वासन दिले होते. त्यापूर्वीच जेसीबीच्या साहाय्याने रस्त्याच्या तात्पुरत्या दुरुस्तीला सुरुवात करण्यात आली आहे.
सध्या रस्ता खोदून खड्डे बुजविण्याचे काम सुरू असले तरी, काही दिवसांनी पुन्हा रस्त्याची अवस्था पूर्ववत होऊ नये यासाठी मजबूत आणि कायमस्वरूपी डांबरीकरण करण्यात यावे, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.








