• सप्टेंबर महिन्यातच ‘ऑक्टोबर हिट’चा तडाखा
  • गणेशोत्सवात उन्हाने नागरिक हैराण

बेळगाव : ऐन गणेशोत्सवात बेळगावकरांना उन्हाचे चटके बसू लागले आहेत. गेल्या काही दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतल्याने वातावरणात बदल झाला असून दिवसा उन्हाचा तडाखा जाणवत आहे. त्याचबरोबर रात्रीच्या वेळीही उकाडा वाढल्याने नागरिक हैराण होत आहेत. पावसाळ्याच्या दिवसांनंतर अचानक वाढलेल्या उष्णतेमुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.
पाऊस माघारी गेल्यानंतर शहर परिसरात आकाश निरभ्र राहण्याचे प्रमाण वाढले आहे. सकाळपासूनच उन्हाची तीव्रता जाणवू लागते. दुपारच्या सुमारास उन्हाचा तडाखा अधिक जाणवत असून रस्त्यावर वर्दळ असलेल्या ठिकाणी नागरिकांना उन्हापासून बचावासाठी छत्री, टोपी किंवा स्कार्फचा आधार घ्यावा लागत आहे.

दुचाकीवरून प्रवास करणाऱ्यांनाही उन्हाचा विशेष त्रास होत आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार पुढील काही दिवसांत तापमानात चढ-उतार होण्याची शक्यता आहे.