- कर्नाटक उच्च न्यायालयाचा निर्णय ; बेळगाव बार असोसिएशनचे अध्यक्षपद कायम
बेळगाव / प्रतिनिधी
बेळगाव बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. एस. एस. किवडसन्नावर यांच्यावरील अविश्वास ठराव कर्नाटक उच्च न्यायालयाच्या धारवाड खंडपीठाने रद्दबातल ठरवला आहे. या निकालामुळे ॲड. किवडसन्नावर पुढेही बार असोसिएशनच्या अध्यक्षपदी कायम राहणार आहेत.
गेल्या २० सप्टेंबर २०२५ रोजी किवडसन्नावर यांच्याविरोधात अविश्वास ठराव मंजूर करण्यात आला होता. या ठरावाला आव्हान देत त्यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. सुनावणीदरम्यान ॲड. किवडसन्नावर यांच्यावतीने ॲड. विजयकुमार शीलवंत, तर बार असोसिएशनतर्फे ॲड. नयना निर्ली यांनी युक्तिवाद केला. दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर न्यायालयाने अविश्वास ठराव अवैध ठरवत तो रद्द केला.
या प्रकरणाची पार्श्वभूमी अशी की, बेळगाव न्यायालयात काही बोगस वकील प्रॅक्टिस करत असल्याच्या तक्रारीवर अध्यक्षांनी कारवाई न केल्याचा आरोप करण्यात आला होता. या मुद्द्यावरून ४५५ वकिलांनी अविश्वास ठरावाची मागणी केली होती. त्यानंतर उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार विशेष सर्वसाधारण सभा घेऊन मतदान झाले होते आणि उपाध्यक्ष ॲड. बसवराज मुगळी यांची प्रभारी अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.
मात्र, आता उच्च न्यायालयाने ही संपूर्ण प्रक्रिया रद्द ठरवत अविश्वास ठराव बाद केला आहे. न्यायालयाच्या आदेशानंतर किवडसन्नावर यांच्या समर्थकांनी न्यायालय परिसरात आनंदोत्सव साजरा केला. मंगळवारी सकाळी बेळगाव न्यायालयात त्यांचे अभिनंदन करण्यात आले.
या निर्णयावर प्रतिक्रिया देताना ॲड. किवडसन्नावर म्हणाले की, न्यायालयाने त्यांच्यावरील सर्व आक्षेप दूर करून पुन्हा एकदा वकील बांधवांची सेवा करण्याची संधी दिली आहे. सर्व वरिष्ठ व सहकारी वकिलांना विश्वासात घेऊन बेळगाव बार असोसिएशनच्या १५० व्या वर्धापन दिनाच्या तयारीसाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांनी या निकालासाठी सर्व सहकारी व वरिष्ठ वकिलांचे आभारही मानले.







