• पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर अधिकाऱ्यांना आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचना

बेळगाव : शहरात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असताना आमदार अभय पाटील यांनी लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांसह राकसकोप धरणाची पाहणी केली. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या प्रमुख जलस्रोतांपैकी असलेल्या या धरणातील उपलब्ध पाणीसाठ्याची त्यांनी प्रत्यक्ष माहिती घेतली.

पाणीटंचाईची स्थिती लक्षात घेऊन आमदार पाटील यांनी संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा केली आणि नागरिकांना पाण्याअभावी कोणताही त्रास होऊ नये, यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना तातडीने राबविण्याचे निर्देश दिले.

यावेळी त्यांनी शहरातील बंद पडलेल्या कूपनलिका त्वरित दुरुस्त करून कार्यान्वित करण्यास प्राधान्य द्यावे, असे सांगितले. तसेच ज्या प्रभागांमध्ये पाण्याची कमतरता अधिक आहे, त्या भागांत महापालिकेने तातडीने टँकरद्वारे पाणीपुरवठ्याची व्यवस्था करावी, अशा सूचनाही त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.

पाणीपुरवठ्याची स्थिती सातत्याने तपासून नागरिकांच्या अडचणी दूर करण्यासाठी प्रशासनाने समन्वयाने काम करावे, असेही त्यांनी यावेळी नमूद केले.या पाहणी दौऱ्यात बेळगावच्या महापौर प्रीती कामकर, उपमहापौर हनुमंत कोंगाळी, विविध नगरसेवक तसेच महानगरपालिका आणि जलमंडळाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.