अथणी / वार्ताहर

बेळगाव जिल्ह्यातील अथणी येथील दरूरजवळ माजी उपमुख्यमंत्री, आमदार लक्ष्मण सवदी यांच्या कार आणि मालवाहू वाहनामध्ये अपघात झाला. लक्ष्मण सवदी हे अथणीहून गोकाक मार्गे बंगळुरूला जात होते. यावेळी त्यांच्या कारला एका मालवाहू वाहनाची धडक झाली. सुदैवाने लक्ष्मण सवदी धोक्यातून बचावले. अपघातानंतर लक्ष्मण सवदी दुसऱ्या कारने बंगळुरूला निघाल्याचे कळते.

आज दुपारी ४:०० वाजण्याच्या सुमारास आमदार लक्ष्मण सवदी बसलेल्या कारला एका मालवाहू वाहनाने धडक दिल्याने हा अपघात झाला. या अपघातात मालवाहू वाहनाच्या चालकाचा निष्काळजीपणामुळे असल्याचे स्पष्ट झाले आहे. अपघातानंतर आमदार लक्ष्मण सवदी यांनी खाली उतरून मालवाहू वाहन चालकाच्या प्रकृतीची विचारपूस केली. अपघातात दोन्ही वाहन चालकांना कोणतीही दुखापत झाली नाही आणि ही घटना अथणी पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली.