• भाषेची सक्ती करून ती शिकवता येत नाही

बेळगाव / प्रतिनिधी

भाषेची सक्ती करून ती शिकवता येत नाही. मुळात आपण आपल्या आईकडून जी भाषा शिकतो तीच खरी भाषा असते आणि तीच शेवटपर्यंत टिकते. भाषेची सक्ती करणारी सरकारे येतील अन् जातील, परंतु भाषा कायम टिकून राहते, असे मत अभिनेते सयाजी शिंदे यांनी व्यक्त केले. “ऑल इज वेल” या मराठी चित्रपटाच्या प्रमोशनसाठी आज मंगळवारी सयाजी शिंदे बेळगावात आले असता, मराठी भाषा संवर्धनाबाबत ते बोलत होते.

हजारो वर्षापासून टिकून राहिलेली आपली मराठी भाषा बदलणार नाही. आपण आईकडून जी भाषा शिकतो तीच खरी भाषा असते. आई-वडिलांपेक्षा जगात कोणतेही मोठे विद्यापीठ नाही. त्यामुळे शैक्षणिक संस्थांमध्ये सरकारने भाषेची सक्ती करणे याला मी फारसे महत्त्व देत नाही.

आपली मराठी भाषा ही आपल्या आईची भाषा आहे. मला इतर भाषांचाही आदर आहे, परंतु सर्वात जास्त आदर मराठी भाषेबद्दल आहे. राजकारणात जो इतरांना डावलतो त्याला एक दिवस डावललं जात, डावावर डाव होत असतात. राजकारणात सतत बदल होत असतात, त्यामुळे त्याबद्दल न बोललेलं बरं असे सांगून मराठी माणसाने आपल्या मातृभाषेवरील प्रेम दाखवून दिले पाहिजे. त्यासाठी त्यांनी कमीत कमी आपल्या मुलांना मराठी भाषेत शिक्षण दिले तरी खूप आहे, असे मत सयाजी शिंदे यांनी व्यक्त केले.