• बेळगाव शहर परिसरात नागपंचमीची जोरदार तयारी

बेळगाव / प्रतिनिधी

उद्या मंगळवार दि. २९ जुलै रोजी साजऱ्या होणाऱ्या नागपंचमी सणाच्या पार्श्वभूमीवर शहरातील बाजारपेठेमध्ये खरेदीला चांगला उत्साह दिसून आला. नागमूर्ती, फुले – फळे, हळद-कुंकू या पूजा साहित्याची नागरिक मोठ्या प्रमाणात खरेदी करत आहेत. विशेषतः महिलावर्ग फराळाच्या खरेदीसाठी लागणाऱ्या वस्तू खरेदी करताना पाहायला मिळाले.

नागपंचमी हा श्रावण महिन्यातील महत्त्वाचा सण आहे. या दिवशी नागदेवतेची पूजा करण्यात येते. ग्रामीण भागात वारुळाची पूजा केली जाते. शहरात नागदेवतेची मूर्ती खरेदी करून त्याची स्थापना करून पूजा केली जाते. या सणानिमित्त लाडू चिवडा व चकल्या आदी फराळ केला जातो. सध्या बाजारात माती पासून तयार करण्यात आलेल्या नागदेवतेच्या मूर्तीची किंमत २० रु. पासून १०० रु. आहे. फराळासाठी वापरले जाणारे चिवडा पोहे ८० रु. किलो, लाडू पोहे ७५ रु. किलो, मका पोहे ७० रु. किलो, लाह्या १० लि. असे दर आहेत.

फराळाला लागणाऱ्या साहित्यामध्ये बेसन साखर सुकामेवा यांची मागणी वाढली आहे. मागील वर्षी प्रमाणे यावर्षीही दर स्थिर असून खरेदीचा जोर कायम आहे. गेल्या काही दिवसांपासून पावसाचा जोर वाढला असला तरीही खरेदीसाठी लोकांची गर्दी मात्र कमी झाली नाही.