• वडगाव परिसरात निर्बंध : जिल्हाधिकाऱ्यांनी जारी केला आदेश

बेळगाव / प्रतिनिधी

वडगाव येथील प्रसिद्ध श्री मंगाई देवी यात्रेत प्राणी व पशुबळीवर बंदी घालण्यात आली आहे. जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी शनिवारी यासंबंधीचा आदेश जारी केला आहे. यात्रेच्या काळात मंदिर परिसर किंवा वडगाव परिसरात देवदेवतांच्या नावे प्राणी व पशुबळी करण्यास निर्बंध असणार आहे. विश्व प्राणी कल्याण मंडळाचे अध्यक्ष श्री दयानंद स्वामीजी यांनी देवदेवतांच्या नावे यात्रेच्या काळात प्राणी व पशुहत्येवर बंदी घालण्याची विनंती केली होती. गेल्या वर्षीप्रमाणेच यंदाही त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे विनंती अर्ज पाठवला होता. यावरून जिल्हाधिकाऱ्यांनी बंदीचा आदेश जारी केला आहे.

दि. २० ते २५ जुलैपर्यंत होणाऱ्या यात्रेच्या काळात कर्नाटक प्राणीहत्या बंदी कायदा १९५९ अन्वये हा आदेश देण्यात आला आहे. परिसरात स्वच्छता राखण्याबरोबरच कायदा व सुव्यवस्था परिस्थिती अबाधित ठेवण्यासाठी एखाद्या मंदिर परिसरात देवदेवतांच्या नावे प्राणी व पशुबळी देणे कायद्याच्या विरुद्ध आहे. त्यामुळे भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ च्या कलम १६३(१),(३) अन्वये श्री मंगाई देवी यात्रेच्या काळात मंदिर परिसर व वडगाव परिसरात प्राणी व पशुबळींवर बंदी घालण्यात आली आहे.