• १२ जणांवर गुन्हा ; चार आरोपींना जामीन

निपाणी : अधिक परताव्याचे आमिष दाखवून नाशिकमधील गुंतवणूकदारांची तब्बल १३३ कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा कथित प्रकार निपाणी येथे उघडकीस आला आहे. या प्रकरणी बसवेश्वर चौक पोलीस ठाण्यात १२ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, अटक केलेल्या चार आरोपींना न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. मुख्य आरोपीसह उर्वरित संशयितांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तपासाची चक्रे गतिमान केली आहेत.

नाशिक येथील रहिवासी प्रकाश पितांबर पाटील यांनी यासंदर्भात पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. त्यांच्या तक्रारीनुसार, निपाणीतील निंबाळकर कॉलनी येथे राहणाऱ्या प्रसाद तात्यासाहेब पाटील (वय ३४) याच्यामार्फत चालवल्या जाणाऱ्या गुंतवणूक संस्थेत त्यांनी पैसे गुंतवले होते. या संस्थेकडून गुंतवणुकीवर आकर्षक परतावा देण्याचे आश्वासन देण्यात आले होते.

सुरुवातीच्या काळात गुंतवणुकीवर नियमित परतावा मिळाल्याने गुंतवणूकदारांचा विश्वास बसला. मात्र, काही काळानंतर परताव्याचे पैसे मिळणे बंद झाले. गुंतवणूकदारांकडून जमा करण्यात आलेला निधी वैयक्तिक वापरासाठी वळवण्यात आल्याचाही आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

या तक्रारीच्या आधारे २४ नोव्हेंबर रोजी १२ जणांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला. याप्रकरणी नंदा तात्यासाहेब पाटील, तात्यासाहेब बालगोंडा पाटील, पूनम प्रसाद पाटील आणि पूनम संदीप शिंपुकाडे या चौघांना पोलिसांनी अटक केली होती. त्यांना न्यायालयात हजर केले असता जामीन मंजूर करण्यात आला.

दरम्यान, या प्रकरणातील मुख्य आरोपी प्रसाद तात्यासाहेब पाटील याचा शोध घेण्यावर पोलिसांनी विशेष लक्ष केंद्रित केले आहे. इतर संशयितांनाही ताब्यात घेण्यासाठी शोधमोहीम सुरू आहे. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन जिल्हा पोलीस अधीक्षक के. रामराजन स्वतः तपासावर लक्ष ठेवून आहेत.