• उडुपी येथील स्पर्धेत बेळगावच्या ३२ कराटेपटूंचा सहभाग
  • काता आणि कुमिते प्रकारांत कौशल्याचे प्रदर्शन

बेळगाव : उडुपी येथे आयोजित ९व्या राष्ट्रीय ओपन इन्व्हिटेशनल कराटे चॅम्पियनशिप–२०२६ स्पर्धेत बेळगावच्या भारती बुडोकान कराटे अँड स्पोर्ट्स अकादमीच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरी करत शहराच्या क्रीडा क्षेत्राची मान उंचावली. राष्ट्रीय स्तरावरील या स्पर्धेत अकादमीच्या ३२ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवून आपल्या कराटे कौशल्याची चुणूक दाखविली.

कर्नाटक कोबुडो बुडोकान कराटे-डो असोसिएशनच्या वतीने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. काता आणि कुमिते या दोन्ही प्रकारांत सहभागी होत विद्यार्थ्यांनी शिस्त, आत्मविश्वास, तांत्रिक कौशल्य आणि खिलाडूवृत्तीचे दर्शन घडविले. विविध गटांमध्ये उत्कृष्ट प्रदर्शन करत त्यांनी पदके आणि चषक पटकावले.

या स्पर्धेत आदवी, वेदा, सिद्धी, ईशान्वी, शिवान्या, स्वरा, सारा, भूमी, प्रजता, लावण्या, निमिषा, अनन्या, पूर्णश्री, आयुष, वेदांत, भूषण, विराज, स्वस्तिक, साईश, साई दर्शन, सुधीर, आर्यन, पंचम, श्रीरंग, इरण्णा, श्रीकृष्ण, प्रणीत, शौर्य, श्रीतेज, दक्ष आणि गणेश यांनी सहभाग घेतला.

विद्यार्थ्यांच्या या कामगिरीमागे अकादमीचे मुख्य प्रशिक्षक सेन्साई आकाश एम. बडिगेर यांचे मार्गदर्शन आणि प्रशिक्षण महत्त्वपूर्ण ठरले. नियमित सराव, तांत्रिक कौशल्यांचा विकास आणि स्पर्धात्मक तयारी यावर त्यांनी विशेष भर दिला.

या यशाबद्दल अकादमीच्या वतीने सर्व सहभागी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करण्यात आले. आगामी राष्ट्रीय तसेच उच्चस्तरीय स्पर्धांमध्येही विद्यार्थ्यांनी अशीच यशस्वी कामगिरी करावी, अशा शुभेच्छा व्यक्त करण्यात आल्या. बेळगावच्या युवा कराटेपटूंनी राष्ट्रीय स्तरावर उमटवलेली ही छाप शहराच्या क्रीडा क्षेत्रासाठी निश्चितच अभिमानास्पद आहे.